Tuesday, May 21, 2019

जलयुक्त शिवार घोटाळ्यातील आरोपींना जामीन मंजूर


परळी वैजनाथ (प्रतिनिधी )

अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जलयुक्त शिवार घोटाळ्यातील आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
परळी कृषी कार्यालयाअंतर्गत तालुक्यात सन २०१५ ते २०१७ या कालावधीत परळी तालुक्यात ज्या गावामध्ये शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामाबाबत तक्रारीवरून झालेल्या चौकशी अहवालामध्ये अनियमितता दाखवून संबंधित कामावर देखरेख करणारे अधिकारी व व कर्मचारी यांनी शासन सेवकांचा अधिकाराचा गैरवापर एकूण ३०७ कामामध्ये त्यांना अधिकार असलेले शासकीय दस्तऐवजांमध्ये फेरफार करून बनावट दस्तऐवज खरे आहेत असे भासवत त्यांना सदर दस्तऐवज हा खोटा व बनावट असताना देखील त्याचा वापर केला व शासकीय कामामध्ये विश्वासघात करून शासनाची फसवणूक केली. यामध्ये २ कोटी ४१ हजार ६७२ रुपयांचा अपहार केला अशी फिर्याद तालुका कृषी अधिकारी भिमराव बांगर यांनी दि. ०७/०३/२०१८ रोजी दिल्यावरून पोलीस स्टेशन परळी शहर येथे एकूण २४ आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.यातील अजित अनंतराव गिरी, नवनाथ नरहरी नागरगोजे, स्वप्नील अनिलराव घोडके, नितीनकुमार परशुराम शिखरे यांना दि.२१/०१/२०१९ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आरोपी जेलमध्ये होते. आरोपींनी जामीन मिळण्यासाठी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी होऊन सर्व आरोपींना न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींची ५० हजार रुपयांच्या जामीनावर तसेच प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी हजेरी व साक्षीदारावर दबाव आणणार नाही, या अटींवर मुक्तता करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात आरोपी स्वप्नील अनिलराव घोडके, नितीनकुमार परशुराम शिखरे यांच्या तर्फे अँड.अण्णासाहेब लोमटे यांनी काम पाहिले.