Wednesday, June 20, 2018

राजस्थानी मल्टीस्टेटचे चेअरमन श्री.चंदुलाल बियाणी यांची मुलाखत






परळीच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे चंदुलाल बियाणी. व्यक्ती म्हणून नाही तर ते एक विश्व आहेत. अतिशय कस्ठाने आणि खडतर प्रवासाने त्यांनी ही उंची गाठली आहे. स्वतः डी फार्मसीचे शिक्षण पूर्ण केलेले असताना त्यांनी अनेक वर्षे वैद्यकीय क्षेत्रात काम केले. परंतु त्यांचे वडील स्व.मोहनलालजी बियाणी आणि आई माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी यांच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी आज हाती घेतलेला आहे. अनेक माध्यमातून त्यांनी अनेकांना मोठी मदत केली व त्यातून बरीच माणसे आज विविध क्षेत्रात नामांकित व्यक्ती म्हणून परिचित आहेत. आणि म्हणूनच स्व.काकाजींनी (मोहनलालजी बियाणी) स्थापन केलेली दैनिक मराठवाडा साथी ही संस्था आजही माणसं घडवणारी संस्था म्हणून ओळखली जाते.

चंदुलाल बियाणी यांनी अनेक क्षेत्रात मोठे भरीव काम केले आहे. परळीच्या नगर पालिकेचे ते माजी सभापती आणि विद्यमान नगरसेवक आहेत. राजस्थानी नागरी पतसंस्था आणि राजस्थानी मल्टिस्टेट चे ते अध्यक्ष आहेत. या संस्थेचा संपूर्ण मराठवाडाभर विस्तार आहे. परळीत मुख्य कार्यालय असून औरंगाबाद येथे कॉर्पोरेट ऑफिस आहे. एकूण 8 शाखा सध्या कार्यरत असून या संस्थेच्या आणखी तेवढ्याच शाखा प्रस्तावित आहेत. औरंगाबाद, परळी, अंबाजोगाई, बीड, सोनपेठ, सिरसाळा येथील लोकांना या संस्थेने भक्कम आधार दिला आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवणे हाच या संस्थेचा मुख्य उद्देश असून आपलेपणाने जपलेली आणि वाढविलेली ही संस्था आजमित्तिस लोकांचा श्वास झाली आहे. आर्थिक व्यवहार तर संस्थेतून होतातच परंतु अध्यक्ष असलेले चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून अनेक सामाजिक उपक्रमही राबविण्यात येतात. दरवर्षी उन्हाळ्यात जनावरांसाठी पाणवठे आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून शुद्ध आणि फिल्टर्ड पाण्याच्या पाणपोई सूरु केल्या जातात. दहावी आणि बारावी परीक्षेत मोठे यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जातो. सामाजिक ऋण परतफेडीची भावना जपत यातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतही केली जाते. राजस्थानी मल्टिस्टेट ही आता संस्था राहिली नसून ती एक परिवार झाली आहे. फक्त परिवार नाही तर असा परिवार की ज्याला संख्येची मर्यादा नाही, संस्थेच्या नावाची उंची, तिचा कार्यविस्तार दिवसेंदिवस वाढतच आहे.राजस्थानी मल्टिस्टेटच्या माध्यमातून जशी आर्थिक क्रांती झाली आहे तशीच परळीच्या शैक्षणिक क्षेत्रातही खूप मोठे पाऊल पडले आहे. संस्थेच्या अर्थसहाय्याने परळी शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांची स्थापना झाली आहे. राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टच्या बचपन प्ले स्कुल आणि पोदार लर्न स्कुलची स्थापना परळीत झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांना मोठं मोठ्या शहाराप्रमाणे परळीतही शिक्षण मिळू लागले आहे. त्याचबरोबर परळीच्या नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे या हेतूने उभारण्यात आलेल्या राजस्थानिज डीएफसी जिमला उभारण्यासाठीही राजस्थानी मल्टिस्टेटने भक्कम आर्थिक आधार दिला. छोटू कोल्हापुरी, सुयोग ऍक्वा, महेशनगर, जगमित्र नगर आदींसह अनेक व्यवसाय उभे राहिले आहेत. हे करण्यासाठी अर्थातच चंदुलाल बियाणी यांनी पुढाकाराने आणि आपल्या सहकारी संचालकांना विश्वासात घेवून, त्यांना आत्मविश्वास देऊन हे साम्राज्य उभे केले आहे. राजस्थानी मल्टिस्टेटच्या अनेक शाखांच्या माध्यमातून जसे श्रीमंत लोक व्यवहार करतात तसेच सर्वसामान्य आणि कस्ठकरी, कामगार लोकही जोडले गेले आहेत. आपल्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक सभासदाच्या अडचणीच्या काळात ही संस्था भक्कमपणे उभी राहते. शेकडो ग्राहकांच्या वैद्यकीय, शैक्षणिक अडचणीच्या वेळी या संस्थेने आर्थिक आधार तर दिलाच आहे, परंतु वैद्यकीय आणि शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करून दिली आहे.शुद्ध बिजापोटी, फळे रसाळ गोमटी.... या उक्तीप्रमाणे प्रमाणे स्व.मोहनलालजी बियाणी आणि माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी यांच्या सामाजिक आणि धार्मिक विचारांचा वारसा चंदुलाल बियाणी समर्थपणे चालवत आहेत. विसाव्या शतकातील महान संत ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्यावर बियाणी परिवाराची प्रगाढ श्रद्धा आहे. माऊली महाराजांनी अनेक वेळा बियाणी परिवाराला भेट दिली आहे. त्यांच्या कृपेने आणि आशीर्वादानेच मला कोणतेही काम करण्याची ताकद आणि आत्मविश्वास प्राप्त होतो असे चंदुलाल बियाणी सांगतात. ते जसे विविध क्षेत्रात न थकता काम करतात तसे ते अगदी कुटुंबवत्सल आणि परिवारातील सर्वांना सांभाळून घेऊन चालणारे आहेत. स्व.काकाजींच्या जाण्याने बियाणी परिवारावर आभाळ कोसळले, मात्र परिवारात सर्वात जेष्ठ असलेले चंदुलाल बियाणी यांनी परिवारातील सदस्यांना काकाजींची कमतरता भासु दिली नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ते प्रचंड सकारात्मक विचार करतात हेसुद्धा एक नवलच आहे. अनेक संकटांचा आणि अडचणींचा सामना ते सकारात्मक विचारांच्या बळावरच समर्थपणे करतात. शेकडो, हजारो नाही तर लाखो लोक आज बियाणी परिवाराशी जोडल्या गेले आहेत. त्यांच्याशी कायमचा स्नेह आणि जिव्हाळ्याचे संबंध जोडण्यात चंदुलाल बियाणी यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्याशी जोडल्या गेलेले असंख्य लोक हीच आपली खरी ताकद आणि हीच आपली संपत्ती असे त्यांना नेहमी वाटते. आणि म्हणूनच राजकारण, समाजकारणाच्या माध्यमातून चंदुलाल बियाणी यांनी परळी शहरात अनेक चळवळींना जन्माला घातले आणि त्यांच्या माध्यमातून जनकल्याणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या असंख्य सुधारणा घडवून आणल्या. त्यांच्या याच कार्याची दखल अनेक वेळा देशाचे माजी कृषिमंत्री खा.शरदचंद्र पवार साहेब, माजी गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे, स्व.विमालताई मुंदडा, माजी खासदार राजनीताई पाटील, राज्याचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, यांनी दखल घेतली आहे. राजकारण वेगळे आणि चांगल्या कामासाठी निरपेक्ष संबंध असणे वेगळे अशा भावनेतून दै. मराठवाडा साथीच्या व्यासपीठावर त्यांनी अनेक दिग्गज नामवंतांना आपल्याशी जोडून घेतले आहे. याचबरोबर मारवाडी युवा मंचच्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी आपल्या अध्यक्षतेखाली मोठी चालना तर दिलीच आहे, पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून परळीसारख्या शहरात अनेक नामांकित साहित्यिक, वक्ते, उद्योगपतींना, नेत्यांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आणले आहे. त्यातून परळी शहराला नवे विचार, नव्या संकल्पना मिळत गेल्या आणि परळीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी भर पडत गेली.

आदर्श संचालक मंडळ

राजस्थानी मल्टीस्टेटच्या अलौकीक यशात सर्वाधिक महत्वाचा वाटा संचालक मंडळ आणि मल्टीस्टेटमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाचा आहे. मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी हे एक उपक्रमशिल व्यक्तीमत्व असून, अत्यंत धाडसाने निर्णय घेणे, ते अंमलात आणणे आणि घेतलेल्या उपक्रमात यश मिळविणे असे एक समिकरण चंदूलाल बियाणी या नावाशी जोडले गेले आहे. मल्टीस्टेटचे अध्यक्ष बियाणी यांच्या समवेत उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव पी.डी.अग्रवाल, कोषाध्यक्ष विजयप्रकाश लड्डा तसेच संचालक अशोक जाजू, सतिश सारडा, सौ.मधूमती पोकर्णा, सौ.प्रेमलता बाहेती, कचरूलाल उपाध्याय, अजय पुजारी, नामदेवराव रोडे गुरूजी असे अत्यंत कर्तव्यदक्ष सामाजिक क्षेत्रात सर्वपरिचीत असणारे सर्व संचालक मंडळ हेच मल्टीस्टेटचे मुख्य भांडवल आहे. सहकार म्हणजे हातात हात घेवून सहकारी संस्था पुढे घेवून जाणे असते. राजस्थानी मल्टीस्टेटचे सर्व संचालक मंडळ अत्यंत एकदिलाने एकमेकांना सहकार्याचा हात देत संस्थेला उंचावर घेवून जात आहेत. मल्टीस्टेटच्या या यशाचा दुसरा आधार कर्मचारी वर्ग असून, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.बी.कुलकर्णी व सर्व शाखेतील कर्मचारी यांना या आधाराचे श्रेय द्यावेच लागेल. साथी हात बढाना, एक अकेला थक जाये तो.... या नया दौर मधील काव्यपंक्ती नुसार सर्व संचालक व त्यांचे कर्मचारी काम करीत आहेत हे येथे उल्लेखनिय आहे. 

सामाजिक उपक्रमांचे स्त्रोत

बॅंका आणि पतसंस्था किंवा मल्टीस्टेट या संस्था आर्थिक व्यवहाराशी निगडीत असल्या तरी आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून काम करणेही महत्वाचे असते. अशा अनेक प्रकारच्या पुण्यांच्या कामाची राजस्थानी मल्टीस्टेटने आखणी करीत भांडवलापेक्षाही अधिक अमुल्य असे पुण्य कमविले आहे. शहरात उन वाऱ्यात फिरणाऱ्या जनावरांसाठी विविध ठिकाणी 111 पानवठे उभारणे, नागरीकांसाठी परळी, अंबाजोगाई, सोनपेठ, सिरसाळा येथे शुध्द व फिल्टर्ड पाण्याची पाणपोई सुरू करणे, पक्षांसाठी चारा व पाणी देण्यासोबत त्यांना भांडे देणे असे वेगवेगळे अनेक उपक्रम राजस्थानी मल्टीस्टेटने राबविले आहेत. एवढेच नाही तर विविध नागरीकांना उपचार पश्चात लागणाऱ्या यंत्रसामुग्रीची अल्प दरात उपलब्धता मल्टीस्टेटने करून दिली आहे. वृध्दांसाठी व्हील चेअर, वॉकर, सलाईन स्टॅण्ड, कॉट, ऑक्सीजन सिलींडर अशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचसोबत स्वर्गरथ सुध्दा उपलब्ध करून दिला आहे. थोडक्यात पशुपक्षांपासून थेट नागरीक, उपचार घेणारे रूग्ण अशा सर्वांसाठी सामाजीक मदतीचा हात राजस्थानी मल्टीस्टेटने दिला आहे. याचबरोबर सामाजिक भान म्हणून विविध परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह अनेक सामाजिक संस्था व इतर निवडीबद्दलही शेकडो जणांचा गौरव संस्थेच्या वतीने दरवर्षी करण्यात येतो.तसेच दरवर्षी विद्यार्थ्यांना ना नफा ना तोटा तत्वावर शालेय साहीत्य उपलब्ध करून दिले जाते.

अर्थपूर्ण आर्थिक संस्था

कोणतीही संस्था कागदावर नव्हे तर तेथे असलेल्या भांडवलावर चालते. अर्थातच भांडवलासोबत या संस्थेला प्रगतीच्या दिशेने घेवून जाण्यासाठी तेवढेच अनुभवी जबाबदारीने वागणारे आणि विकासाच्या मार्गावर सहकार्य करणारे संचालकसुध्दा आवश्यक असतात. या सर्व गोष्टी जिथे आहेत ती संस्था भरभराट केल्याशिवाय राहूच शकत नाही. म्हणूनच राजस्थानी मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटीला अर्थपूर्ण आर्थिक संस्था असे म्हणता येईल. सरत्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 31 मार्च 2018 ला मल्टीस्टेटचे भागभांडवल रूपये 4892540 एवढे असून राखीव निधी 2119965 रूपये एवढा आहे. संस्थेच्या ठेवींचा आकडा रूपये 315959972 एवढा आहे. राजस्थानी मल्टीस्टेटने रूपये 273507709 एवढे कर्ज दिले आहे. सरत्या आर्थिक वर्षात गुंतवणूकीचा आकडा रूपये 271.06 कोटी रूपये एवढा असून, सरत्या वर्षात संस्थेच्या नफ्यात 8.25 टक्यांनी वाढ झाली आहे. एकूणच राजस्थानी मल्टीस्टेट ही खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण आर्थिक संस्था आहे.

तालुक्यातील पहिली आयएसओ मानांकीत आर्थिक संस्था
राजस्थानी मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी ही परळी तालुक्यातील पहिली आयएसओ मानांकीत संस्था ठरली. संस्थेचे चेअरमन चंदुलाल बियाणी यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील संस्थेने केले उत्तम आर्थिक नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर हे मानांकन या संथेला मिळू शकले आहे. याबरोबरच ही संस्था तळागाळातील लोकांना मदतीचा हात ठरली आहे. राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्था गेल्या 29 वर्षांपासून तर राजस्थानी मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी या दोन्हीही संस्थांनी अतीदुर्बल घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचे उपक्रम राबविले आहेत. या संस्थेत स्मार्ट सेव्हींग खात्यावर 8 टक्के देण्यात येते. मध्यंतरीच्या काळात 10 रूपयांचे चलनी नाणे बंद झाल्याच्या अफवा येत असतांना संस्थेने आपल्या ग्राहकांना भक्कम आधार देवून 10 रूपयांचे चलनी नाणे घेवून त्यांच्या मनात सुरक्षीततेची भावना निर्माण केली. राजस्थानी मल्टीस्टेट आपल्या सभासदांना आकर्षक व्याजदराने वाहन कर्ज, पगार तारण कर्ज, सोने तारण कर्ज आदी तात्काळ आणि सुलभ पध्दतीने उपलब्ध करून देते. यामुळेच या संस्थेशी हजारो सभासद आज जोडले गेले असून, आपल्या हक्काची बॅंक असे नाते त्यांचे संस्थेशी निर्माण झाले आहे.

नव्या दिशा, नवे संकल्प
चंदुलाल बियाणी यांनी राजस्थानी पतसंस्था आणि मल्टीस्टेट या दोन्हीही संस्थांना नव्या उंचीवर आजमित्तीस नेऊन ठेवले आहे. मराठवाड्यात विविध ठिकाणी राजस्थानी मल्टीस्टेटच्या एकंदर 9 शाखा आज कार्यरत आहेत. आणखी तेवढ्याच नव्या शाखा अतिदुर्बल भागांत उघडून झोपडपट्टीत, कष्टकऱ्यांच्या वस्तीत मोठी आर्थिक क्रांती घडवून आणण्याचा त्यांचा संकल्प आहेत. अतिदुर्बल घटकांतील नागरीकांना आर्थिक आधार देणाऱ्या संस्था आज फार कमी आहेत. परंतू राजस्थानी मल्टीस्टेटने आपल्याशी जोडलेले असंख्य सभासद हे आर्थिक मागास आणि कष्टकरी वर्गांतील आहेत. जेवढ्या उंचीचे मोठमोठे प्रकल्प संस्थेने विविध ठिकाणी आर्थिक सहाय्यातून उभे केले आहेत, तेवढ्याच उंचीचे काम म्हणजे आर्थिक कारणांनी पिचलेल्या सभासदांना मदतीचा हात देणे होय. म्हणूनच ज्याला कोणी नाही, त्याला आम्ही.... या भावनेने आता झोपडपट्टी, कष्टकरी वर्ग जिथे जास्त आहे, तीथे राजस्थानी मल्टीस्टेट नव्या शाखा उघडेल असा आमचा संकल्प असल्याचे चंदुलाल बियाणी सांगतात.

भुषवत असलेली पदे

नगरसेवक : नगर पालिका, परळी वैजनाथ
कार्याध्यक्ष : मराठवाडा व्यापारी महासंघ
चेअरमन : राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्था
चेअरमन : राजस्थानी मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी
शहराध्यक्ष : मारवाडी युवा मंच, परळी वैजनाथ
सचिव : प्रदुषण नियंत्रण समिती, परळी वैजनाथ
संचालक : औद्योगीक वसाहत, परळी वैजनाथ
शहराध्यक्ष : मराठवाडा साहीत्य परिषद, परळी वैजनाथ

चंदुलाल बियाणी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणीक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून अनेकांचा सन्मान आणि गौरव केला आहे. याचीच दखल घेवून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्‌ने "गौरवदाता" म्हणून त्यांची नोंद करून घेतली आहे. जवळपास 5 हजार पेक्षाही जास्त    नागरीकांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांनी गौरवीत केले असून, अनेकांना त्यांनी प्रेरित आणि प्रोत्साहीतही केले आहे.