पश्चिम महाराष्ट्रात महापुरामुळे लोकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली असतानाच दुसरीकडे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यावर पाऊस रुसल्याचे चित्र दिसत आहे. ऐन पावसाळ्यातही जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, धारुर, या तालुक्यांना तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब व लातूर जिल्ह्यातील लातूर शहर, एमआयडीसी व मुरूड व अन्य काही गावांना या पाणी पुरवठा होतो. परंतु मागील दोन महिन्यात केवळ मांजरा धरण परिसरात 110 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर तीनही जिल्ह्यांवर कोरड्या दुष्काळाचे संकट ओढवणार आहे.
मांजरा धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत असून सध्या केवळ सहा टक्केच पाणी आहे. ते केवळ एक महिना पुरणार आहे . मागील 37 वर्षांत केवळ 12 वेळा या धरणात 100 टक्के पाणी साठा झाला होता. 2017 मध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. 2018 मध्ये कमी पावसाने हे धरण भरलेच नाही. त्याचा फटका यंदा बसला आहे. पाऊस रुसल्याने लातूर, उस्मानाबादसह बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले. शिवाय धरण भरलेच नाही तर अभूतपूर्व पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
मांजरा धरण एक दृष्टिक्षेप
- सध्याचा शिल्लक पाणीसाठा : 6.509 दलघमी
- 43 किलो मीटरवर या प्रकल्पाचे पात्र असून ते सध्या कोरडे आहे
- धरणाची एकूण साठवण क्षमता : 50 दशलक्ष घनमीटर
- धरणातील शिल्लक पाणीसाठा : उणे 22 दशलक्ष घनमीटर
मांजरा धरणातील उपसा
लातूर शहर -24 दलघमी, लातूर एमआयडीसी- 3 दलघमी, अंबाजोगाई - 3.5 दलघमी, कळंब- 2.25 दलघमी, केज व धारुर- 1.50 दलघमी, मुरुड व शिराढोण - 0.5 दलघमी, युसूफवडगाव- 0.5 दलघमी इतके पाणी वर्षभरासाठी लागते. इतर गावांच्या योजनांसाठी अंदाजे 26 ते 27 दलघमी इतके पाणी घेतले जाते. याशिवाय शेतीसाठी पाणी घेतले जाते. परंतु आता या धरण परिसरात पाऊस झाला नाही तर दुष्काळाचे संकट ओढावणार आहे .
10 दिवसांआड पाणीपुरवठा
धनेगाव येथील मांजरा धरणातून सध्या लातूर शहराला दहा दिवसांआड पाणी पुरवले जात असून रोज 32 एमएलडी पाणी या धरणातून शहरासाठी उचलले जात आहे. लातूर एमआयडीसीसाठी वेगळे आरक्षण देण्यात आले आहे. लातूर शहराला येत्या काळात पाणीटंचाई भेडसावणार असल्याचे चित्र आहे.
पाणी काटकसरीने वापरा
या प्रकल्पाच्या परिसरात पाऊस जर पडला नाही तर परिस्थिती गंभीर बनणार आहे. आम्ही काही उपाययोजना करू शकत नाहीत. सध्या या प्रकल्पात सहा दलघमी पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा अत्यंत काटकसर केली तर दोन महिनेच पुरेल. त्यामुळे नागरिकांनीही काटकसरीने पाणी वापरण्याची गरज आहे. - एस.जी.कोंगे, उपविभागीय अधिकारी, मांजरा प्रकल्प
