Friday, October 18, 2019

स्वत:ची आमदारकी सुरक्षित असताना मला संपवण्याचा अट्टाहास कशासाठी? - ना. पंकजाताई मुंडे



परळी : स्वतःची आमदारकी आणखी साडे तीन-चार सुरक्षित असताना मला संपविण्याचा अट्टाहास कशासाठी? असा सवाल भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी केला आहे. विरोधक विकासाच्या मोठ मोठ्या गप्पा मारायलेत, पण त्यांचे सरकार सत्तेवर येणारच नाही मग ते विकास करणारच कसा असेही त्यांनी म्हटले आहे.
ना. पंकजाताई मुंडे हया आज संध्याकाळी नंदागौळ येथे मतदारांच्या भेटीसाठी गेल्या होत्या पण इथे भेटीचे रूपांतर थेट सभेतच झाले. मतदारांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. उजनी पाटी, घाटनांदूर, बर्दापूर येथे तर धो धो पाऊस सुरू असतांना देखील त्यांच्या सभेला जमलेली गर्दी मागे हटली नाही.
आपल्या भाषणात पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना आपण चांगले पाठबळ दिले त्याबद्दल आभारी आहे तसाच पाठिंबा आताही कायम ठेवा. मागील पाच वर्षांत खूप काही घडलं, आरोप - प्रत्यारोप, गोपीनाथ गड, भगवान भक्तीगडाची उभारणी झाली,सत्तेच्या माध्यमातून कामे झाली हे करत असताना संघर्षही आला. माझा प्रवास यशःश्री बंगला ते मोदींच्या सभेपर्यत झाला त्यांचा प्रवास मात्र बारामतीपर्यंत झाला. मोदींच्या सभेवरून त्यांनी वाट्टेल तशी टीका केली परंतु  मोदींनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले आणि विरोधक तोंडघशी पडले. मोदी मुंडे साहेबांच्या स्मारकाकडे गेले नाहीत म्हणून टीका करणारांनी जिवंतपणी मुंडे साहेबांकडे पाठ फिरवली हे अजून लोक विसरले नाहीत. गोपीनाथ मुंडे हे नाव मतदारसंघाच्या कपाळावर लिहिलेले आहे, ते सहजासहजी पुसले जाऊ शकत नाही, गोपीनाथ मुंडे हे नांव पुसण्यासाठी ते खूप प्रयत्न करत आहेत असेही त्या म्हणाल्या. माझ्या पाठीशी मोदी आहेत, मला आपल्या भागाचा विकास करायचा आहे, इथे उद्योग आणायचे आहेत, लोकांच्या हाताला काम द्यायचे आहे, महिलांना सक्षम करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे बुडते जहाज आहे त्यात बसण्याचा प्रयत्न करू नका, त्यांचे सरकार येणारच नाही मग ते विकास करणार कसा? असा सवाल त्यांनी केला.  विकासाचा पाया मीच रचला असुन शिखरही मीच चढविणार असुन यासाठी आपण मला भरभरून आशिर्वाद द्यावेत असे आवाहन त्यांनी केले.
उजनीत धो धो पाऊस, तरीही गर्दी हटली नाही
दरम्यान उजनी सभा सुरू असताना धो धो पाऊस आला. पण एकानेही आपली जागा सोडली नाही. भर पावसात सभेला मिळालेल्या प्रतिसादाने ना. पंकजाताई मुंडे या भारावून गेल्या. मला काही नको पण तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या असे भावपूर्ण उदगार त्यांनी काढले.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, प्रा. विजय मुंडे, गणेश गिते, सोमनाथ गिते, वैजनाथ आप्पा गारठे,  अविनाश मोरे यांच्यासह महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.