Monday, May 21, 2018

बीडमध्ये ३६० मतदान; तगडी फाईट, फैसला गुरूवारी


बीड  : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळपासून मतदान सुरू झाले. अकरा मतदान केंद्रांवर ३६१ मतदानापैकी ३६० मतदान झाले. माजलगावमध्ये एक मतदार गैरहजर राहिले. या लढतीचा फैसला गुरूवारी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नाराजांची मते धस यांच्या पारड्यात पडल्याचे बोलले जात असल्यामुळे अशोक जगदाळे यांच्या गटात चिंतेचे वातावरण आहे.
बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेसाठी तगडी फाईट पाहाण्यास मिळाली. सुरेश धस विरूद्ध अशोक जगदाळे या दुरंगी लढतीमध्ये साम-दाम-दंडाचा वापर केला गेला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नाराज गटांनी अशोक जगदाळेंना हात दाखवल्याची चर्चा आहे. या मतांचे पॉकेट सुरेश धस यांच्या पारड्यात पडल्याचेही बोलले जात आहे. सोमवारी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली. बीड जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रावर मतदान झाले. ९९.७२ टक्के मतदारांनी आपला अधिकार बजावला. एकूण ३६१ मतदानापैकी २६० मतदारांनी आपला अधिकार बजावला.
माजलगाव येथे एक मतदान गैरहजर राहिल्याने शंभर टक्के मतदान होवू शकले नाही. इतर तालुक्यामध्ये मात्र पूर्ण मतदान झाले. यात बीड ६४, अंबाजोगाई ४०, परळी ४४, माजलगाव ३५, गेवराई ३२, धारूर २४, केज २६, आष्टी २७, पाटोदा २३, वडवणी २२, शिरूरकासार २४ असे मतदान होते. यामध्ये एकूण ६० जि.प.सदस्य, नगर पालिका आणि नगर पंचायतचे २९० सदस्य आणि पंचायत समितीचे ११ सभापती यांनी आपला अधिकार बजावला. तगड्या पोलीस बंदोबस्तात पोलीस प्रशासनाने मतदान केंद्रावर करडी नजर ठेवली. धस विरूद्ध जगदाळे यांच्यात झालेल्या काट्याच्या लढतीचा फैसला गुरूवारी होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
त्या बडतर्फ नगरसेवकांचे मतदान बंद
बीड नगर पालिकेतील आघाडीच्या १० नगरसेवकांना नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकण्याच्या प्रकरणावरून बडतर्फ करण्यात आले होते. या बडतर्फ नगरसेवकांना मतदानाचा हक्क बजावता आला, मात्र त्यांचे मतदान स्वतंत्र लिफाफ्यामध्ये बंद करण्यात आले. जर विजय आणि पराजय उमेदवारांमध्ये १० मताचा फरक निघाल्यास या बडतर्फ नगरसेवकांच्या मतदानाचा लिफाफा फोडून मतदान मोजणी केली जाईल. त्यामुळे हे १० मतदान स्वतंत्ररित्या ठेवण्यात आले आहेत.