Wednesday, August 29, 2018

भगवान गडाची शांतता भंग करण्यासाठी कट - डॉ. नामदेवशास्त्री


पाथर्डी (जि. नगर) ः भगवान गडाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न काही राजकीय शक्तींनी सुरू करून कारस्थान रचले आहे. एकतीस ऑगस्ट रोजी संत भगवान बाबांची जयंती आहे. याच दिवशी गडावर वंजारी समाजाला आरक्षणाबाबत भगवान सेनेने बैठक ठेवली आहे. भगवान गडावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, याची जबाबदारी शासनावर राहील, असा इशारा भगवान गडाचे मंहत डॉ.नामदेवशास्त्री सानप यांनी दिला आहे. भगवान गडाचे महंत डॉ. नादेवशास्त्री सानप यांनी मंगळवारी मुख्यमंत्री, राज्याचे पोलिस महासंचालक, अहमदनगरचे जिल्हापोलिस प्रमुख,जिल्हाधिकारी यांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे. भगवान गडावर संत भगवान बाबांची एकशे बावीसावी जंयती एकतीस ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. हजारो भाविक भगवान गडावर येणार आहेत. भगवानगड हा सर्व जातीधर्माच्या भाविकांचा श्रद्धास्थान आहे. येथे सामाजिक विषय नको ही आमची भावना आहे. ग्रामविकास पंकजा मुंडे यांचे समर्थक बीड जिल्ह्यातील भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी वंजारी समाजाला आरक्षणाची बैठक भगवान गडावर होईल, असे जाहीर केले आहे. तशा बातम्या बीड जिल्ह्यातील वृत्तपत्रातुन प्रसिद्ध झाल्या आहेत. यामुळे भगवान गडाची शांतता काही प्रवृत्तीना पाहवत नाही. मागील दसरा मेळाव्याचा इतिहास पाहता गडावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. पोलिस व महसुल यंत्रणेने याबाबत योग्य ती भुमिका घ्यावी. पुर्वइतिहास पाहता भगवान गडाची शांतता भंग करण्याची काही राजकीय शक्ती कारस्थान करण्याची शक्‍यता आहे. गडाचे महतांनी मुंख्यमंत्री ,पोलिस महासंचालक , जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना वरील शक्‍यता लेखी स्वरुपात निवेदन देवुन व्यक्त केली आहे.मंगळवारी पाथर्डीचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी भगवान गडाला भेट दिली. गडाचे महंत डॉ.नामदेवशास्त्री सानप हे औंरगाबाद येथे गेल्याने त्यांची भेट होवु शकली नाही. गडावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होवु शकला नाही. 

पंकजा मुंडे यांना टोला 

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख टाळीत गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी कराड यांच्या पाठीमागे असणारी राजकीय शक्ती हा टोला पंकजा मुंडे यांना लगावल्याचे बोलले जात आहे. मुंडे व शास्त्री हा थंडावलेला वाद पुन्हा सुरु होण्याची शक्‍यता आहे.