Sunday, September 16, 2018

वैद्यनाथ बॅकेचे कर्ज वितरण प्रकरण ; अंबाजोगाई न्यायालयाने याचिका काढली निकाली ,बॅकेच्या व नेतृत्वाच्या बदनामीचा विरोधकांचा डाव - अशोक जैन

बॅकेच्या व नेतृत्वाच्या बदनामीचा विरोधकांचा डाव  - अशोक जैन

समाज माध्यमांत आलेल्या बातम्या निराधार - बॅकेचा खुलासा 

परळी : वैद्यनाथ सहकारी बॅकेच्या कर्ज वितरण व व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणात परळी पोलिसांनी तपासाअंती 'क्लिन चीट' दिली असल्याने कोणताही गुन्हा निष्पन्न झाला नाही त्यामुळे हे प्रकरण परिणाम शुन्य असल्याचे सांगत अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने यासंबंधी दाखल केलेली याचिका निकाली काढली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढून समाज माध्यमांमध्ये विरोधकांनी जाणूनबूजून पसरविल्या गेलेल्या बातम्या तथ्यहीन असल्याचे वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन यांनी म्हटले आहे. 
मार्च २०१७ मध्ये वैद्यनाथ बॅंकेच्या अध्यक्षासह संचालक मंडळावर परळी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. यासंदर्भात बॅकेचे संचालक विजयप्रकाश तोतला आणि कायदेशीर सल्लागार अॅड. राजेश्वर देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी दावा क्र. १९९०/२०१७ व १७०२/२०१७ अन्वये १२ एप्रिल २०१७ रोजी धाव घेवून परळी     न्यायालयाने पोलिसांना अध्यक्ष व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्यासंबंधी दिलेला आदेश चुकीचा असल्याचे म्हटले होते. यावर खंडपीठाने  परळी पोलिसांचे म्हणणे मागवले होते. पोलिसांनी तपासानंतर यासंदर्भात न्यायालया समोर म्हणणे मांडताना सदर गुन्हयात कसलाही दोषारोप आढळून येत नसल्याचे स्पष्ट नमुद केले. पोलिसांचा हा अहवाल ग्राह्य धरून खंडपीठाने ही याचिका निकालात काढली होती. 
बॅकेचे अध्यक्ष व संचालक मंडळानी सदर दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत असा अर्ज अंबाजोगाई सत्र न्यायालयात दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी निर्णय देताना खंडपीठाच्या निकालाचा आधार घेत अध्यक्ष व संचालक मंडळाला परळी पोलिसांनी अगोदरच क्लिन चीट दिल्याचे सांगितले व यात कोणताही गुन्हा निष्पन्न होत नाही त्यामुळे हे प्रकरण परिणाम शुन्य असल्याचे सांगून याचिका निकालात काढली. याप्रकरणी बॅंकेच्या बाजूने अॅड शरद लोमटे यांनी काम पाहिले. 
बॅकेच्या व नेतृत्वाच्या बदनामीचा विरोधकांचा डाव  - अशोक जैन
न्यायालयाने दिलेल्या निकालाचा चुकीचा अर्थ काढून बॅकेच्या विरोधात समाज माध्यमांमध्ये बातम्या फैलावून      विरोधकांनी बॅकेची तसेच पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांची बदनामी करण्याचा डाव आखला आहे, खासदार डाॅ प्रितमताई मुंडे हया सध्या बॅकेच्या संचालक असल्या तरी हे प्रकरण फार पूर्वीचे आहे, त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बॅक प्रगतीकडे जात आहे. परवाच्या एका निकालाने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याने हा प्रकार होत  असल्याचे बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन यांनी म्हटले आहे.