पहाट गाणी परळीची दिवाळी परंपरा झाली- ना. धनंजय मुंडे
परळी । प्रतिनिधी-
सत्यम शिवम सुंदरम, मन मंदिरा, केंव्हा तरी पहाटे, कही दूर जब दिन ढल जाये...या व अशा अनेक जुन्या व नव्या गाण्यांची मैफिल आज दिवाळी पहाटगाणी कार्यक्रमात रंगली होती. मारवाडी युवा मंच व स्वरनक्षत्र कला अकादमीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध गायीका अमृता पाटील यांच्यासह कृष्णा बळवंत, कुमार पुराणिक अशा स्थानिक कलाकारांनी हा कार्यक्रम चांगलाच गाजविला. काही गाण्यांदरम्यान सादर करण्यात आलेली लहान विद्यार्थीनींची नृत्ये हे सुद्धा या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्ये होते. दरम्यान, समारोपाच्या पार्श्वभुमीवर विधान परिषदचे विरोधीपक्ष नेते ना. धनंजय मुंडे यांनी उपस्थिती दर्शवित मारवाडी युवा मंचच्या पहाट गाणी कार्यक्रमाचे कौतुक करीत हा कार्यक्रम आता परळीकरांचे दिवाळी समिकरण ठरल्याचे सांगीतले.
परळीकरांची दिवाळी पहाट पारंपारिक पद्धतीने आज सप्तसुरात न्हाऊन निघाली. सकाळचे अभ्यंगस्नान झाल्यानंतर दर्दी रसिकांची पाऊले लोकनेते गोपीनथराव मुंडे नटराज रंग मंदिराकडे वळू लागली. सकाळी 6 वा. सुरु झालेला पहाटगाणी कार्यक्रम सुमार 3 तास चालला आणि या कार्यक्रमात सप्तसुरांची एक मैफिलच भरली होती. जय जगदीश्वरी माता सरस्वती या गीताच्या माध्यमातून कृष्णा बळवंत यांनी देवीची प्रार्थना केली आणि पुढे गाण्यांची मैफिल सुरु झाली. कुठे शोधीशी रामेश्वर अन् कुठे शोधीशी काशी, सत्यम शिवम सुंदरम, सखी मंद झाल्या तारका, केंव्हा तरी पहाटे, एक मिरा एक राधा, मन मंदिरा, लेक लाडकी या घरची, राधिका गोरी से, वो जब याद आये, सांग कधी कळणार तुला, कहीं दूर जब दिन ढल जाऐ, धुंदीत गाऊ, निसर्ग राजा ऐक सांगतो अशी एकापेक्षा एक सरस गाणे सादर होत गेली. स्वरनक्षत्र कला अकादमीचे अध्यक्ष तथा गायक कृष्णा बळवंत यांच्यासोबत खास निमंत्रीत करण्यात आलेल्या गायीका अमृता पाटील यांनी विविध गीते सादर केली. त्यांना गायनात अनंत फटाले, धोंडिराम बळवंत, सौ. अश्विनी फटाले, ऋषीकेश बळवंत, सौ. निता बळवंत, शेखर स्वामी, कुमार पुराणिक आदींनी साथ दिली. एकीकडे सुरेल गायन होत असतांनाच या गाण्याला संगीताची साथही तेवढीच महत्वाची होती. सिंथे सायजरवर सिद्धार्थ सुर्यवंशी, तबल्यावर बबन मस्के, ऍक्टीव्ह पॅडवर उमेश टेकाळे यांनी साथ दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रशेखर फुटके व सौ. सुजाता फुटके यांनी केले. पहाटगाणी कार्यक्रमाचे हे 19 वे वर्ष असून सलगपणे हा कार्यक्रम साजरा करण्याचा मान अर्थातच मारवाडी युवा मंच आणि स्वरनक्षत्र कला अकादमी यांच्याकडे जातो.
पहाटगाणी परळीची परंपरा दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम दिवाळीचा अविभाज्य असा घटक बनला असून ही तर आता परळीची सांस्कृतिक परंपरा झाली असल्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते ना. धनंजय मुंडे यांनी सांगीतले. सुमारे तासभर ना. धनंजय मुंडे यांनी पहाट गाणी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. प्रारंभी त्यांचे स्वागत मारवाडी युवा मंच व स्वरनक्षत्र कला अकादमीच्या वतीने चंदुलाल बियाणी व कृष्णा बळवंत यांनी केले. गायक आणि संगीतकारांचे स्वागत ना. धनंजय मुंडे यांनी केले. परळी शहराला सांस्कृतिक ओळख करुन देण्यात मारवाडी युवा मंच व चंदुलाल बियाणी यांचा मोठा वाटा असून दिवाळीत होणारी पहाट गाणी ही परळीची परंपरा झाल्याचे त्यांनी सांगीतले. दरम्यान, या भागातील दुष्काळाच्या पार्श्वभुमीचा संदर्भ देत कमी पावसामुळे यावर्षी पाण्याची अडचण होण्याची शक्यता असून प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याच्या बचतीकडे लक्ष दिले पाहीजे, पाणी वाचविण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे असे त्यांनी सांगीतले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री सरस्वती पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. परळी शहरातील दर्दी रसिक या कार्यक्रमाला गर्दी करुन उपस्थित होता. प्रामुख्याने शैक्षणिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्सही सहकुटूंब सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपात उपस्थित रसिकांना पंचगव्य निर्मित पणत्या भेट म्हणून देण्यात आल्या. मारवाडी युवा मंचच्या सर्वच पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वतीतेसाठी परिश्रम घेतले.
-कार्यक्रमास विविध क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती
-पंचगव्य निर्मित पणत्यांचे उपस्थितांना वितरण
-पहाटगाणी कार्यक्रमाने रसिकांना जिंकले
-सुमारे 3 तास चालला कार्यक्रम
...................
अन् त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले...मारवाडी युवा मंचच्या वतीने वापरण्यायोग्य जुन्या वस्त्रांचे गरजवंतांना वितरण
परळी । प्रतिनिधी-
दिवाळी हा तसा नव्या वस्त्रांचा आणि उत्साहाचा उत्सव असतो. परंतु, प्रत्येकालाच हा उत्सव साजरा करीत असतांना आपल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे भान ठेवावे लागते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरजवंतांना हा उत्सव साजरा करीत असतांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परळी शहरातील गरजवंतांना आज परळीकर नागरिकांकडून संकलीत करण्यात आलेल्या व वापरण्यायोग्य असलेल्या जुन्या वस्त्रांचे वाटप गरजवंतांना साथी सभागृहात करण्यात आले. उपलब्ध वस्त्रे निवडतांना आणि ती स्विकारतांना या गरजवंतांच्या चेहऱ्यावर हसू उमलले.
मारवाडी युवा मंच परळीच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभुमीवर गरजवंतांसाठी वापरलेल्या परंतु टाकून दिलेल्या आणि आणखी वापर होऊ शकेल अशा चांगल्या स्थितीतील वस्त्रांचे संकलन करण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी ही वस्त्रे देऊन गरजवंतांना एक मदतीचा हात दिला होता. आज साथी सभागृहात या वस्त्रांचे वितरण मारवाडी युवा मंचचे पदाधिकारी आणि सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. आपले कपडे अंग वाढले की आपण टाकून देतो, किरकोळ फाटले तरी ते कपडे वापरत नाहीत. अशी टाकून दिलेली परंतु आणखी काही वर्ष वापरता येतील अशा वस्त्रांची मालिकाच परळीकरांनी साथी सभागृहात जमा केली होती. लहान मुलांच्या कपड्यांपासून पुरुषांची वस्त्रे, महिलांच्या साड्या, मच्छरदाणी यासह अनेक वस्तू नागरिकांनी दिल्या होत्या. आपल्यामुळे आमची दिवाळी गोड होत आहे अशी भावना व्यक्त करीत गरजवंतांना या कपड्यांचा स्विकार केला.
