Wednesday, February 6, 2019

सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्त्व प्रा .डॉ . विनोद जगतकर


      आयुष्यात त्याग, समर्पण , सामाजिक बांधिलकी ,संवेदनशीलता  हे गुणविशेष जी माणसे जोपासतात . त्यांचा समाजव्यवस्थेत मानसन्मान केला जातो . ते पुरस्काराचे मानकरी ठरतात . अशी माणसे आपल्या सहवासात आली असतील तर तो आपल्यासाठी अभिमानाचा विषय असतो . त्यांना मिळालेले पुरस्कार हे आपल्यासाठी आनंदाचे क्षण ...
    अगदी असेच माझे जवळचे मित्र प्रा .डॉ . विनोद जगतकर यांना ' परळी भूषण ' पुरस्कार मिळाला ही बातमी माझ्यासाठी तितकीच भूषणाची व आनंदाची . ..
      सरांचं व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी ... ते इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत .भाषेवरही त्यांचे तितकेच प्रभुत्त्व आहे . त्यांच्या सूत्रसंचालनाने कोणत्याही कार्यक्रमात रंग भरला जातो . एक सुप्रसिद्ध वक्ते म्हणून त्यांना ओळखले जाते . ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक - प्राध्यापक आहेत . अशा कितीतरी गुणांचं रसायन त्यांच्या व्यक्तिमत्त्वात  आहे . ह्या त्यांच्या सर्व गुणांची मोहिनी माझ्यावर आहेच ;पण त्यापेक्षा मला त्यांच्यातला ' सामाजिक बांधिलकी ' हा गुण सर्वात जास्त आवडतो .नगर परिषद, परळीचा मी नगराध्यक्ष होतो . त्यावेळी त्यांच्या पत्नी सौ . मनीषा जगतकर ह्या नगरसेविका होत्या . आमची अगोदर असलेली मैत्री या क्षणापासून आणखी घट्ट झाली . नगर परिषदेच्या माध्यमातून विकासात्मक कार्ये कसे करता येतील ?वंचित , उपेक्षित समाजाला न्याय कसा देता येईल ?याबद्दल ते नेहमी माझ्या सोबत चर्चा करत असत . मागास समाज प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकला पाहिजे . यशाची नवी नवी क्षितिजे त्यांनी पादाक्रांत केली पाहिजेत अशी त्यांची मनोभूमिका ... त्यांच्या प्रयत्नामुळे जगतकर गल्ली , कालात्रयीदेवीच्या आजुबाजूचा परिसर इथे आम्हाला ना . धनंजयजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास साधता आला . त्यांच्या या ' सामाजिक बांधिलकी ' मुळेच या परिसराचा आम्ही चेहरामोहरा बदलू शकलो . दसरा मैदानावरील डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे उद्यान केवळ त्या परिसराची नाही तर आता परळीची शान बनलेले आहे . जिथे थांबणे अशक्य होते तिथे मोकळा श्वास घेण्यासाठी व आयुष्य वृद्धिंगत करण्यासाठी लोक येतात . लोकांचे आयुर्मान वाढण्यास हे उद्यान उपयुक्त ठरत आहे . हे पाहून मन भरून येते .
       भीम महोत्सव गेल्या पाच वर्षापासून परळी शहरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो . त्या भीम महोत्सवाचा मी अध्यक्ष तर डॉ .जगतकर हे सचिव . या महोत्सवाच्या माध्यमातून नाटक , संगीत मैफल , कविसंमेलन अशा विविध कार्यक्रमाची मेजवानी आम्हाला परळीकर रसिकांना देता आली . याबरोबरच चित्र, रांगोळी , ज्ञान वृद्धिंगत करणारी प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सृजनाला वाव देतानाच त्यांचे वैचारिक विश्व समृद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडता आली .भीम महोत्सवाच्या माध्यमातून ना .धनंजयजी मुंडे यांच्या परीसस्पर्शाने आम्हाला सामाजिक अभियांत्रिकीचा आदर्श वस्तुपाठ घालता आला .
     शांतीवन दलित स्मशानभूमीचे सुशोभीकरण हा येथील समजाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न होता . या स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यासाठीही सरांची भूमिका अग्रक्रमाने महत्त्वाची राहिलेली आहे .
    डॉ . जगतकर यांना त्यांच्यातील ' सामाजिक बांधिलकी ' या गुणामुळेच ' परळी भूषण ' पुरस्काराने सन्मानित केले गेले असावे . असा मला सार्थ विश्वास आहे . यापुढेही त्यांच्या हातून समाजसेवेचं कार्य घडत राहो व तेअनेक पुरस्काराचे मानकरी ठरावेत . ही अपेक्षा ...
    त्यांच्या उज्ज्वल भावी आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा ... !

*बाजीराव धर्माधिकारी*
*माजी नगराध्यक्ष आणि शहराध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी परळी वैजनाथ*