Saturday, May 11, 2019

माकडांच्या हल्ल्यात सारडगाव येथील शेतकरी जखमी



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
वनविभागाच्या जमिनीमध्ये फिराणार्‍या माकडांनी सारडगाव येथील शेतकरी महादेव अंकुश सातभाई यांच्यावर हल्ला चढवुन जखमी केले. त्यांना सारडगाव येथील युवानेते संजय आघाव, बी.एन.आघाव, ग्रामपंचायत सदस्य राजेश मारोती आघाव आदींनी त्यांना परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले.सारडगाव परिसरात फिरत असलेल्या वन्यप्राण्यांकडून मनुष्यावर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. महादेव अंकुश सातभाई हे आपल्या शेतातील लिंबुणीच्या झाडांना पाणीदेण्यासाठी गेले असता आजुबाजूला असलेल्या पाच माकडांनी एकाचवेळी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्लयात माकडांनी सातभाई यांच्या पायावर, मांडणीवर, हाताला चावे घेतले. आरडा ओरड केल्यानंतर सदरील माकडांनी पळ काढला. सारडगाव परिसरात वनविभागाकडुन वन्यप्राण्यांसाठी कुठल्याच प्रकारची पाण्याची व इतर सुविधा उपलब्ध केली नसल्याने हे वन्यप्राणी शेतकर्‍यांच्या पिकांकडे मोर्चा वळवत आहेत. आता पर्यंन्त शेतकर्‍यांकच्या पिकांची नासाडी करणारे हे वन्यप्राणी आता शेतकर्‍यांवर हल्ला करु लागले आहेत. यामुळे सारडगाव परिसरातील शेतकरी विशेषता महिला मध्ये घबराट पसरली असुन या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी सारडगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.