डिएमआयटी टेस्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मार्ग – जितेंद्र बोरा
परळीत भव्य रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबीर उत्साहात
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- झपाट्याने बदलत जाणाऱ्या या आधुनिक जगात अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांचेच आयुष्य खुप व्यस्त बनत चालले असतांना आपल्याला दिसते. या व्यस्त आयुष्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. शारीरिक स्वास्थ्य बिघडले तर ते पटकन लक्षात येते पण याचा परिणाम जर मानसिक स्वास्थ्यावर झाला तर मनुष्याची कार्यक्षमता कमी होने, स्मरण शक्ति कमी होने, स्वभावात छिडछिडेपणा वाढणे अश्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. म्हणुन कामाचा, अभ्यासाचा किंवा इतर कुठल्याही गोष्टीच्या मेंदुवर येणाऱ्या मानसिक ताण तणावा पासुन स्वतःला दुर ठेवण्यासाठी ध्यान हा प्रभावशाली उपाय ठरू शकतो, त्याचबरोबर आज तरूणांनी भविष्य ओळखण्याची गरज असून, भविष्ययाकडे पाहुणच तरूणांनी रोजगाराच्या संधी ओळखल्या पाहीजेत असे प्रतिपादन अमरावती येथील प्रा.शिवाजी कुचे यांनी केले. त्याचबरोबर डीएमआयटी टेस्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याचा मार्ग खुला करून देणारी संधी असल्याने पालकांनी मुलांची कलचाचणी करून त्यानुसार संस्कार करावेत असे मत बेंगलोर येथील कौंसिलर जितेंंद्र बोरा यांनी व्यक्त केले.
मराठवाडा साथी मल्टीसर्व्हीसेस आणि स्मार्ट ब्रेन टेक्नो सर्व्हीसेसच्या संयुक्त विद्यमाने केल्या जाणाऱ्या डीएमआयटी या अभिनव बुध्दीमत्ता कल चाचणी म्हणजे काय? त्याची आजच्या काळात गरज काय? यासंदर्भात मार्गदर्शन शिबीर व भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन परळी वैजनाथ येथे करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित शेकडोजणांना अमरावती येथील अंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तथा करिअर मार्गदर्शक प्रा.शिवाजी कुचे व बेंगलोर येथील करिअर काऊंसेलर जितेंद्र बोरा यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. डीएमआयटी टेस्ट करून घेणारे पालक मोठ्या मोठ्या शहरांमध्येच आहेत. तेथील शाळेत प्रवेश घेतांनाच विद्यार्थ्यांची कलचाचणी केली जाते व त्यानुसार विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांच्या करिअरला दिशा दिली जात असल्यामुळे ग्रामिण भागापेक्षा शहरी भागातील विद्यार्थी जास्त यशस्वी ठरतात हे त्यापाठीमागचे रहस्य असल्याचा उलघडाही आज झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला. परळीतील वैद्यनाथ औद्योगीक वसाहत येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मराठवाडा साथी मल्टीसर्व्हीसेसचे प्रमुख मार्गदर्शक चंदुलाल बियाणी, राजस्थानी मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, औरंगाबादचे मीडिया सेलचे प्रमुख अनिल सावंत, डॉ.बालासाहेब कराड, डॉ.ज्ञानेश्वर घुगे, पोदार स्कुलचे प्राचार्य बी.पी.सिंग, दै.मराठवाडा साथीचे संपादक सतिश बियाणी, पत्रकार लक्ष्मण वाकडे, धनंजय आरबुने, जगदीश शिंदे, प्रशांत प्र.जोशी राजस्थानी मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.बी.कुलकर्णी, सौ.अर्चना मुंदडा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रा.शिवाजी कुचे या कार्यक्रमात पुढे बोलतांना म्हणाले, आपण कितीही मानसिक तणावाचे काम करत असलो तरी आपण आपल्या मानसिक तनावाचे व्यवस्थापन करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला उपाय शोधण्यासाठी कुठेच जाण्याची आवश्यकता नाही, आपल्याला फक्त आपल्या अंतरंगात डोकावून पहावे लागेल. त्यासाठी मेडिटेशन हा उत्तम पर्याय आहे. मेडिटेशनच्या सहाय्याने अगदी 18 तास कामात व्यस्त असलेल्या व्यक्ति देखील आनंदी आयुष्य जगु शकतात व अनेक प्रकारचे मानसिक आजार दूर करून निरोगी आयुष्य जगणे शक्य आहे हे अनेकांनी अनुभवले आहे. आज रविवार, दि.२१ जुलै रोजी झालेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डिएमआयटीचे कार्यकारी संचालक सुरज बियाणी, अजय पुजारी, ओमप्रकाश बुरांडे, अनंत भाग्यवंत, आनंद हाडबे, जयप्रकाश बियाणी, सौ.वंदना कांबळे, सौ.शेळके यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले.
विद्यार्थ्यांचा न्यूनगंड दूर होतो!
प्रा.शिवाजी कुचे यांनी रविवार, दि.30 जून रोजी झालेल्या कार्यक्रमात डोक्यातील ताण-तणाव दूर करण्यासाठी जिब्रेस मेडीटेशनबद्दल सर्वांना प्रत्यक्षिकाद्वारे माहिती दिली. विद्यार्थ्यांना आजच्या काळात इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणे अत्यावश्यक असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर होऊन आत्मविश्वास निर्माण होतो. जीवनातील प्रत्येक पायरीवर आनंद घेण्यासाठी नटराज मेडिटेशन शिकवून याद्वारे आपण स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक कसे ठरू शकतो? हे समजावून सांगितले. त्याचबरोबर 10 हजार वर्षांपूर्वी आपल्या संतांनी वेद लिहून जगण्याचे सर्व सूत्र लिहून ठेवले असून, आज त्याला वैज्ञानिक गोष्टींची जोड देऊन मानवी जीवन सुखी करू शकतो असे सांगत सर्वात शेवटी कृतज्ञता हे मेडिटेशन घेत उपस्थित शेकडो जणांना प्रा.शिवाजी कुचे यांनी प्रभावित केले.
रोजगार मेळाव्यातून शेकडो अर्ज
मराठवाडा साथी मल्टीसर्व्हीसेस व स्मार्ट ब्रेन टेक्नो सर्व्हीसेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळावा व भव्य मार्गदर्शन शिबीरात आज शेकडो जणांनी आपली नोंदणी केली. विद्यार्थ्यांची कलचाचणी करण्यावर पालक विशेष भर देत आहेत. डीएमआयटी ही आपल्यासाठी चालून आलेली करिअरची विशेष संधी आहे हे लक्षात घेवून त्यामध्ये आपण आपले व आपल्याबरोबरच अनेकांचे भविष्य घडवू शकतो हे लक्षात आल्याने या सामाजिक मोहीमेत आपण सहभागी होऊन आपले करिअर घडवले पाहीजे यासाठी शेकडो जणांनी या रोजगार मेळाव्यात नोंदणी केली. ईच्छुक तरूणांना भविष्यकाळात हजारो रूपये कमविण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे.
