परळी वै( प्रतिनिधी)....
देशात धार्मिक व जातीय द्वेषाला खतपाणी घालत हल्ले करण्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत. सर्वधर्म समभावाच्या भारतीय संस्कृतीला तडा देणाऱ्या या घटनांच्या विरोधात ०६ जुलैला बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. या माॅब लीचींग विरोधातील परळी बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर पाठिंबा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले.
आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक प्रेमाने व सलोख्याने राहत आलेले आहेत. परंतु मागील काही वर्षात देशामध्ये अल्पसंख्यांकांवर वारंवार धर्म व जातीच्या नावावर हल्ले होत आहेत. भारतीय संविधानाने सर्व जाती-धर्माच्या व पंथांच्या लोकांना संवैधानिक अधिकार दिलेले आहेत. यावर गदा आणून राज्यघटनेचा अपमान हे समाजकंटक करताना दिसून येत आहेत. शासन व प्रशासन दरबारी याची योग्य तशी दखल घेतली जात नसल्यामुळे यांचे मनोबल दिवसेंदिवस वाढतच आहे. या विरोधात शनिवार ०६ जुलै रोजी परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असून शांतता व लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
