परळी वै. (प्रतिनिधी)
एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार्या विविध दर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, बर्याच सवलत धारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी) अद्याप स्मार्ट कार्ड घेतलेले नाही. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाली असून स्मार्टकार्डअभावी विद्यार्थ्यांची तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी सवलत धारकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड घेण्यास 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला असल्याची माहिती परळीचे आगारप्रमुख रणजित राजपूत यांनी दिली आहे.
सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाल्याने स्मार्ट कार्ड घेण्यासाठी एसटी केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी सवलत धारकांचीही गर्दी होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील सवलतधारकांना स्मार्टकार्डे देण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच इतर सवलतधारकांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीच्या पासच्या आधारे तर इतर सवलत धारकांना ओळखपत्राच्या आधारे प्रवासाची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून जुनीच पद्धती अवलंबण्यात येणार आहे. यासंदर्भात एसटी मुख्यालयातून सूचना देण्यात आल्या आहेत.
