नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : लोकसभा निवडणुकांमध्ये दमदार विजय मिळवल्यानंतर आता भारतीय जनता पार्टी विधानसभेच्या तयारी लागली आहे. त्यासाठी नेत्यांच्या बैठकांवर बैठका घेण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका या मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आसल्याचा निर्णय अमित शहा यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकांसाठी 3 राज्यांमध्ये आपली कंबर कसली आहे. यासाठी मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयात राज्यातील भाजप उमेदवार आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीमध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डादेखील उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका लढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन व राज्याला बसलेला अतिवृष्टीचा तडाखा यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती. राज्यात पुरस्थिती असतानाही यात्रा सुरूच ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांवर विरोधपक्षांनी चौफेर टीका करत हल्लाबोल केला होता. मात्र, विरोधकांच्या दबावाला बळी न पडता भाजपने ही यात्रा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यात्रेचा दुसऱ्या टप्पा ज्या ठिकाणावरून सुरू होणार आहे त्या ठिकाणच्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना महाजनादेश यात्रेचा दौरा प्राप्त झाला आहे. 22 ऑगस्ट रोजी धुळे येथून सकाळी महाजनादेश यात्रेला प्रारंभ आहे. अमळनेर येथे सकाळी 11.30 वाजता तर धरणगाव येथे 12.30 वाजता महाजनादेश यात्रा पोहोचणार आहे तर दुपारी 1.30 वाजता जळगाव येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता जामनेर येथे व सायंकाळी पाच वाजता भुसावळात जाहीर सभा होणार आहे.
