Tuesday, August 20, 2019

३५४ करोडोंच्या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला अटक


नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी यांना अंमलबजावणी संचालनालयानं आज सकाळी अटक केलीय. रतुल पुरी हे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे आहेत. ३५४ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यासंबंधी त्यांना अटक करण्यात आलीय. पुरी हे मोझर बेअर कंपनीचे माजी कार्यकारी संचालक आहेत. १८ ऑगस्टला पुरी यांच्यावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता. पुरी वगळता कंपनीच्या चार अन्य संचालकांवरही सीबीआयनं गुन्हे दाखल केलेत. त्याआधी सीबीआयनं कंपनीची कार्यालयं आणि आरोपी संचालकांची निवासस्थानं अशा सहा ठिकाणी छापेमारी केली होती. १७ ऑगस्ट रोजी ३५४ करोड रुपयांच्या बँक घोटाळ्या प्रकरणी तक्रार दाखल करून सीबीआयनं छापेमारी केली होती. त्यानंतर अंमलबजावणी संचलनालयानं PMLA अंतर्गत तक्रार दाखल केली आणि काल रात्री उशिरा रतुल पुरी यांना अटक करण्यात आली.'मोझर बेअर' कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि रतुल पुरी यांचे वडील दीपक पुरी, संचालक आणि कमलनाथ यांची बहीण नीता पुरी, संजय जैन आणि विनीत शर्मा यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत.'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'नं या घोटाळ्याची तक्रार केलीय. कंपनी २००९ पासून विविध बँकांकडून कर्ज घेत होती आणि अनेकदा कर्जफेडीच्या अटींमध्ये बदल करून घेत असल्याचा आरोप बँकेनं केलाय.