परळी :- ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली साहेबांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक अभ्यासू, सुंसंस्कृत, तत्वनिष्ठ, सर्वांना हवहवसं वाटणारं व्यक्तिमत्वं आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
धनंजय मुंडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, अरुण जेटली हे सर्वमान्य नेतृत्वं होतं. बहुतेक सगळ्याच पक्षात त्यांचा मित्रपरिवार होता. 1970 च्या दशकात विद्यार्थी चळवळीतून सुरु झालेली त्यांची कारकिर्द आज केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहचली असली तरी यामागे त्यांनी घेतलेले कष्ट, मनातली लोककल्याणाबद्दलची आस्था होती, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, परराष्ट्र व्यवहार, कायदा व न्याय विषयांचा अशा अनेक विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभ्यासाबरोबरंच त्यांनी राजकारणाला नैतिकतेचं अधिष्ठान दिलं. भारतीय जनमानसाची नस ओळखणारे ते नेते होते.
माझ्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पक्षाचे नेते म्हणून त्यांच्याशी अनेकदा संपर्क आला, त्यावेळच्या आठवणी आजही ताज्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आजारी असतानाही चालू घडामोडींवर त्यांचं भाष्य सुरुच होतं, ही त्यांची बांधिलकी होती. जेटली साहेबांच्या अकाली निधनानं भारतीय राजकारणाची मोठी हानी झाली आहे. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, मनोहर पर्रीकर साहेब, सुषमाजी स्वराज यांच्यासारख्या नेत्यांच्या आकस्मिक निधनानंतर अरुण जेटली साहेबांचं आपल्यात नसणं ही मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. मी जेटली साहेबांना विनम्र श्रद्धांजली वाहतो. अशी शब्दात श्री. धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
