परळीकरांनो, माझ्या पाठीमागे मोठे नाव नसले तरी मी तुमच्यासाठी केलेले काम हीच माझी शिदोरी आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत मला मतदान दिल्याचा आपल्याला अभिमान वाटेल असेच काम आपण करून दाखवू असा विश्वास परळी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रस आघाडीचे उमेदवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीतील ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांना दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केला आहे.
येत्या 21 ऑक्टोबरला होणार्या परळी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलतांना श्री मुंडे म्हणाले, राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी माझी निवड केली. मिळालेल्या या संधीतून मी शेतकरी, सर्वसामान्य, कष्टकरी, महिला, कामगार, युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदार संघातून पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे.
आदर्श मतदारसंघ ही ओळख निर्माण करणार
परळी विधानसभा मतदार संघ हा देशातील पहिल्या शंभर आणि राज्यातील पहिल्या वीस विकसित मतदार संघातील एक आदर्श असा ‘परळी मतदार संघ’ अशी ओळख मला निर्माण करायची आहे. यासाठी या मतदार संघात शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरूण, व्यापारी, महिला व सर्वसामान्यांसाठी काम करायचे आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारण, समाजकारणाच्या माध्यमातून आपण येथे प्रामाणिकपणे काम करत आहेत. आता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना परळी विधानसभा मतदार संघ आदर्श मतदार संघ घडविण्याचे आपले स्वप्न आणि ध्येय आहे.
मातीतल्या माणसासाठी लढाई
परळी ही माझी जन्म आणि कर्मभूमी आहे. आपल्या मातीतील माणसाचे जीवनमान उंचवावे, त्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून यावी, त्यांचे जीवन निर्भय, सुखी, आनंदी व्हावे हे माझ्या उराशी बाळगलेले स्वप्न आहे. परळी विधानसभा मतदार संघात केवळ रस्ते, वीज, पाणी, या मुलभूत विकासकामांबरोबरच मतदार संघातील प्रत्येक नागरिकांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होईल त्यांची प्रगती होईल असे काम मला करून दाखवायचे आहे असेही श्री मुंडे यांनी सांगितले.
जायकवाडीचे पाणी आणणे हे ध्येय
शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत बोलताना श्री मुंडे म्हणाले, येथील बळीराजाच्या जीवनात कृषीक्रांती घडवून आणायची आहे, यासाठी जायकवाडी धरणाचे काम परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पात आणून परिसर सुजलाम सुफलाम करायचा आहे, फलोत्पादन योजना, दुग्धव्यवसाय, भाजीपाला, फळे, फुले लागवडीसाठी प्रोत्साहन देवून शेतकर्यांना शेतीपूरक उद्योग उभारून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, प्रत्येक शेतकर्याचा जीवन विमा काढून त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम आपण करणार आहोत, मतदार संघात येणार्या मांजरा नदी खोर्यातील विविध गावातही जलसिंचन वाढीसाठी आपले प्रयत्न असणार आहेत.
बेरोजगार भावांसाठी एम.आय.डी.सी. आणणार
युवकांमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या धनंजय मुंडे मध्ये युवक, बेरोजगारांच्या प्रश्नाबद्दल विशेष तळमळ आणि त्यांच्यासाठीचा एक स्वतंत्र कार्यक्रम दिसून आला. युवकांच्या प्रश्नावर बोलतांना श्री मुंडे म्हणाले, बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभारण्याचे आपले स्वप्न आहे, याठिकाणी मोठे उद्योग आणून या भागातील बेरोजगारी संपुष्ठात आणायची आहे, युवकांसाठी अद्ययावत क्रीडा संकूलन, विविध खेळाचे प्रशिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र, शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेचा परळी पॅटर्न शिवाय खुल्या व्यायामशाळा, जीमची निर्मिती आपल्याला करायची आहे.
महिला बचत गटांचे सक्षमीकरण
केवळ शेतकरी, तरूण यांच्या बाबतीतच नव्हे तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी धनंजय मुंडे आग्रही असल्याचे या मुलाखतीच्या दरम्यान लक्षात आले. महिलांसाठी बचत गटाची चळवळ वाढीस लावून त्यांना आपला व्यवसाय करण्यासाठी भांडवल मिळवून देण्याबरोबरच बचतगट भवनाची निर्मिती, मालाची खरेदी, विक्री अशा गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या आहेत, मुलींसाठी स्वतंत्र जीम उभारण्याचा, शाळकरी मुलींना सायकली देण्याचाही आपला प्रयत्न आहे असेही ते म्हणतात.
व्यापार पेठेला गत वैभव प्राप्त करून द्यायचे आहे
येथील बाजारपेठेला गतवैभव प्राप्त करून देण्याबरोबरच व्यापार्यांच्या समस्या सोडवून परळी-अंबाजोगाई रस्ता, रखडलेला बायपास, शहरात एकेरी वाहतूक अशा समस्या सोडविण्याबरोबरच पंढरपूर यात्रेसाठी परळीमार्गे जाणार्या वारकर्यांसाठी वारकरी भवन, श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा केंद्र सरकारच्या सुचित समावेश, परळी हे भव्य पर्यटन केंद्र व्हावे यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत असेही श्री.मुंडे म्हणाले.
पिण्याच्या पाण्यावर विशेष भर
तिव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मागील 8 महिने वाण धरण कोरडे असतानाही परळीकरांना पाण्याची टंचाई न जाणवू देणार्या धनंजय मुंडेंना परळीत या पुढील काळात कधीच पाणी टंचाई जाणवू नये असे वाटते, त्यादृष्टीकोनातूनच यासाठी काय करता येईल ? याचा मास्टर प्लॅनच त्यांनी या मुलाखतीत मांडला. परळी शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी खडका (ता.सोनपेठ) येथील गोदावरी बंधार्यातून पाणीपुरवठा करणे, चांदापूर तलावातून परळी शहरासाठी पर्यायी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे व शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहे असे सांगून श्री मुंडे यांनी स्वच्छ परळी, सुंदर परळी, हरित परळी व प्रदूषण मुक्त परळी हे आपले ध्येय आहे असेही सांगितले.
