Wednesday, October 16, 2019

लोकनेत्याच्या लेकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परळीत जाहीर सभेची तयारी; मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - ना.पंकजाताई मुंडे



परळी : भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्यासह जिल्हयातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील  मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी भाजपकडून सुरू आहे. मोदींची प्रथमच  सभा दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या  जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या परळीत होत आहे. या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी पूर्ण झाली असून सुरक्षा व्यवस्था व न भुतो न भविष्यति असा बंदोबस्त सर्वत्र तैनात करण्यात आला असल्याने परळीला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज गुरूवारी  (दि  १७ ऑक्टोबर) रोजी परळीत जाहीर सभा होणार आहे. सकाळी ११ वा. वैद्यनाथ महाविद्यालया समोरील २७ एकर वरील  मैदानात नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. सभेला महायुतीचे जिल्हयातील सर्व उमेदवार तसेच प्रदेश स्तरावरील भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत. सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पंतप्रधानांच्या आगमानानिमित्त सुरक्षेच्या दृष्टीने मोठी तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा दल, पोलिसांचा मोठा ताफा, वायुसेना, स्थलसेना यांची हेलिकॉप्टर तपासणी आदी पुर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे बंब, रूग्णवाहिका, वैद्यकीय पथक अशी सर्व सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे.
       एकीकडे प्रशासन पंतप्रधान मोदी यांच्या सभेची तयारी करीत आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष देखील युद्धपातळीवर मोदींच्या सभेची तयारी करीत आहे. या ठिकाणी ५० बाय ४०  चे मुख्य व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. वाॅटर प्रुफ   सभामंडपाची उभारणी करण्यात आली   आहे. तसेच सभेच्या ठिकाणी 3 हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. स्वतंत्रपणे बैठक व्यवस्था करण्यात आली असून महिला, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, अतिविशिष्ट, विशिष्ट,  निमंत्रित, पत्रकार, असे कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.
     पोलीस यंत्रणेने श्वान, बॉम्बशोधक पथका मार्फत सभास्थळ व परिसराची तपासणी केली. बंदोबस्तासाठी बाहेरून मोठा पोलीस  बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी, हजारो  पोलीस कर्मचारी, एसआर पीएफ , मोबाईल जॉमर, वाहन आदी व्यवस्था लावण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरात वेगळा बंदोबस्त राहणार आहे.

वाहतुक व्यवस्था वळवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर  परळीत विविध मार्गाने  येणारी वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. सभेसाठी येणारी गर्दी लक्षात घेता परळी शहराकडे येणारी वाहतुक सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत बंद करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड,नांदेडकडे जाणारी वाहतुक तेलगावहुन माजलगाव पाथरीकडे तर अंबाजोगाईहुन गंगाखेड,नांदेडकडे  जाणारी वाहतुक पिंपळा धायगुडा येथुन पुस मार्गे परळी जवळील धर्मापुरी फाटा येथुन गंगाखेडकडे वळवण्यात आली आहे. सभेसाठी येणा-या वाहनांची परळी बाहेर पार्किंग करण्यात आली आहे.सभास्थळी जाण्यासाठी बसेस ची व्यवस्था करण्यात येणार आहे. सिरसाळा, बीड,माजलगाव कडुन येणा-या वाहनासाठी नागनाथअप्पा हालगे ईंजिनीअरीग कॉलेज येथे पार्किंग करुन सभास्थळी जाण्यासाठी बसेस ची व्यवस्था करण्यात आली आहे. अंबाजोगाई कडुन येणार्या वाहनासाठी हॉटेल सपना जवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.