Saturday, October 19, 2019

अभिमन्यू चक्रव्यूह भेदणार आहे...!!!

असं म्हणतात की निवडणूक ही क्रिकेट च्या खेळासारखी आहे. क्रिकेट मध्ये जसे शेवटचा चेंडू टाकेपर्यंत कळत नाही की डाव कोणत्या बाजूने फिरलाय. 
तीच गत निवडणुकांची ! अगदी मतदान केंद्रावर जाऊन मत देईपर्यंत त्याच्या मानसीकतेला झुलवण्याचे , बद्दलवण्याचे सगळे डाव टाकले जातात. साम दाम दंड भेद सगळ्या प्रकारे  शेवटच्या क्षणापर्यंत डावपेच आखले जातात. 
राज्यशास्त्राच्या अभ्यासक असणाऱ्या डेव्हीड इस्टन या पाश्चात्य विचारवंताने राजकारणाचा वर्तनवादी सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांतानुसार इस्टन म्हणतो की विशिष्ट काळात विशिष्ट लोक विशिष्ट प्रकारचे वर्तन करीत असतात. 
उदा. निवडणूकीच्या आधी मतदार हा कायम हवालदिल उपेक्षित असतो पण निवडणूक काळात तोच अतिमहत्वाचा ठरतो. याउलट सत्ताधारी आधी बेदरकार बेमुर्वत असतो पण ऐन निवडणूकीच्या काळात तो कमालीचा नम्र भावुक असतो किंबहुना तसे भासवतो.
जसे उडप्यांचा मतावर डोळा ठेवून आदित्य ठाकरे स्वतः लुंगी घालून उडपी मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करतात तर परळी सारख्या ठिकाणी पंकजा मुंडे पुम्हा एकदा भावनिक खेळी करत महिला कार्ड खेळतात. 

निवडणूकीचा संपूर्ण प्रचार संपत आला तरी पंकजा मुंडे भर सभेत रडल्या कशा नाहीत हा प्रश्न अनेकांना पडला होता कारण विकासाच्या मुद्द्यांवर उभा राहिलेला संघर्ष पंकजा यांनी भावनिक मुद्यावर  आणला नसता तर नवल वाटले असते.

दसरा मेळाव्यात अमित शहा आणि निवडणूक प्रचार काळात नरेंद्र मोदींच्या सभा घेऊनही प्रतिस्पर्धी असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या पाठीशी एक मोठी लोकशक्ती उभी राहतेय जी काही केल्या हटत नाही हे पुरेपुर लक्षात आलं अन पंकजा यांनी आपलं भावनिक ब्रम्हास्त्र बाहेर काढले. नेहमी प्रमाणे भर सभेत रडणे, चक्कर येणे मग परलीकरांनी भावनिक होणे हे नाट्यमय रीत्या घडत गेले. 

पंकजा काय म्हणाल्या
उपस्थित जनसमुदायाला भावुक करत त्या म्हणाल्या, मि इतकी वर्ष तुम्हाला(धनंजय ला) राखी  बांधते , तुम्हाला भाऊ म्हणते" अन तुम्ही मला बहिणाबाई म्हणता?
सुजाण उपस्थित जणांनी विचार करायचाय की abp माझाच्या कट्टयावर  लोकसभा सुरू असताना भावा बहिणीच्या नात्यासंबंधी प्रश्न दोघांना वेगवेगळ्या भागात राजीव खांडेकरांनी विचारला होता तेव्हा धनंजय मुंडे यांचं उत्तर होतं की मी धनु दादा ही हाक फार मिस करतोय.
याचेच उत्तर जेव्हा पंकजा यांना विचारले तेव्हा त्या म्हणाल्या , की आता आम्ही प्रतिस्पर्धी आहोत त्यामुळे इतर चर्चाना काही अर्थ उरत नाही. 

धनंजय मुंडे यांनी कुठल्याही मुलाखत सभा किंवा सभागृहात बहिणबाई हा आदरार्थी शब्द उच्चारलाय पण याउलट पंकजा यांच्या तोंडी मात्र 'विरोधक' , 'कुणीतरी'  'समोरची व्यक्ती' asa तिरस्कारपूर्ण उल्लेख आलाय.

अगदी आठ दिवसापूर्वी bbc मराठी ने एक मुलाखत प्रसिद्ध केलीय त्यात ही त्या धनंजय मुंडे यांना भाऊ म्हणणे तर दूरच पण नाव घेणे सुद्धा टाळतात , मी विरोधकांना फारसं गांभीर्याने घेत नाही हे पंकजा यांचं विधान धनंजय मुंडे या नावाबद्दल किती कमालीचा आकस भरला आहे याचं प्रमाण देणारं असतं. म्हणजे ज्यांनी गेली दहा वर्षे माध्यमांच्या समोर विरोधक याशिवाय दुसरा शब्द उच्चारला नाही त्या आता मी राखी बांधते भाऊ म्हणते या अकल्पित गोष्टींना भावनिक मुलामा देऊन मांडतात हे आश्चर्यकारक आहे. 
पंकजा मुंडे यांच्या मनात किती द्वेष भरला आहे की त्यांनी बहिणबाई या शब्दावर आक्षेप घ्यावा. भावनातिरेकने त्या म्हणाल्या कुणी आपल्या बहिणीला बहिणबाई म्हणतं का?
या मेलोड्रामॅटिक वाक्यावर हसावं का रडावं तेच कळत नाही.  पण यात त्यांची चूक नाही , परदेशात शिक्षण झालं. महाराष्ट्रात आलात तरी परळीत फार कमी वावरलात. मराठवाड्याच्या मातीत तुमचे पाय कधी मळले नाहीत. त्यामुळे मराठवाड्याच्या मातीतली माणसं अन इथल्या शब्दातला गोडवा तुम्हाला काय कळावा?
मराठवाड्यातल्या अनेक शेतकरी कुटुंबात बहिणबाई हा शब्द अत्यंत आपुलकी अन आदराने उच्चारला जातो. पण निवडणूक अन सत्ता हव्यासात तुम्ही हा पवित्र शब्द ही डागाळला..!!!

विकासाचा मुद्दयाची चर्चा या  अंतिम टप्प्यावर भावनिक पातळीवर आणली. धनंजय मुंडे यांचे चारित्र्य डागळण्याचा प्रयत्न केला. उद्या लोक काहीही कौल देवोत, विजय कुणाचाही होवो पण परलीकरांच्या नजरेत धनंजय मुंडे हा अजय योद्धा आहे. 
भावनिक कार्ड खेळून कदाचित तुम्ही निवडणूक जिंकाल पण धनुभाऊनी आमची मनं जिंकली आहेत.
शेवटी एकच सांगेन

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणत,"जेव्हा तुमचे प्रभावक्षेत्र वाढत जाते तेव्हा लोक आधी तुम्हाला भयभीत करण्याचा* *प्रयत्न करतात, जेव्हा तुम्ही भयभीत होत नाहीत घाबरत नाहीत तेव्हा ते तुमच्या संबंधाने वेगवेगळे भ्रम जनमानसात रुजवून तुमचा भवताल भ्रमित करण्याचे प्रयत्न करतात.अन जर लोक भ्रमित ही होत नसतील तर मग ते तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. भय भ्रम चरित्र हत्या ही ब्राम्हणी अस्त्र आहेत यापासून बहुजनांनी  सावध राहिले पाहिजे.

सुज्ञास अधिक सांगणे न लगे


प्रा सुषमा अंधारे
             अध्यक्ष, गणराज्य संघ