Tuesday, May 22, 2018

सरस्वती विद्यालयात भरली 27 वर्षांपूर्वी ची शाळा

 

सरस्वती विद्यालयात भरली 27 वर्षांपूर्वी ची शाळा

परळी वै.
"आठवणीच्या जगात पुन्हा जावेसे वाटते
गेलेले बालपण पुन्हा जगावेसे वाटते"
            हा विचार मनात ठेऊन येथील श्री सरस्वती विद्यालयाच्या 10 वी बॅच 1990-91 च्या वतीने स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि.19 व 20 मे रोजी शहरातील बी के गार्डन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
              जवळपास 27 वर्षानंतर शै. वर्ष 1990-91 या वर्षात इ.10 मध्ये शिकणारे विद्यार्थी एकत्र आले होते. परिचय कार्यक्रमानंतर सर्व मित्र व मैत्रिणींनी सहभोजनाचा आनंद घेतला. दि.20 मे रोजी सर्व जुन्या विध्यार्थ्यांची पुन्हा शाळा श्री सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात भरली. विशेष म्हणजे या बॅच मधील 40 वर्ग मैत्रिणी आपल्या मुलांसह उपस्थित होत्या.खूप मोठ्या काळानंतर जुने मित्र
मैत्रिणी एकत्र आल्याने वातावरण आनंददायी बनले होते. सकाळच्या प्रार्थनेनंतर सर्वांनी आपल्या वर्गखोलीस भेट देऊन जुन्या स्मृती जागृत केल्या. बी के गार्डन येथे आयोजित गुरुजन सन्मान सोहळ्यास शाळेतील सर्वश्री नानेकर सर, देशपांडे सर, कवडे सर, नरवणे सर, चाटे सर, देशमाने सर, मोगरकर सर, रोडे सर, मैंद सर तसेच टाले मॅडम, बजाज मॅडम व काळे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या प्रसंगी या बॅच मधील डॉक्टर, वकील, अभियंता, उद्योजक, समाजसेवक या पदावर कार्यरत असणारे वर्ग मित्र व  मैत्रिणी यांचा कौतुक सोहळा पार पडला. या वेळी मनोगत व्यक्त करताना शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रम आयोजकांचे कौतुक करून भविष्यात देखील असेच स्नेहमीलन कार्यक्रम आयोजित करून एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले.
   दुपारच्या आमरस मेजवानी नंतर सर्व जुन्या मित्र मैत्रिणींनी 'मी संपर्कात राहणार' असे म्हणत परस्परांचा निरोप घेतला . या कार्यक्रमासाठी जवळपास 130 विध्यार्थी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा.प्रवीण नव्हाडे व रंजना सुपेकर यांनी केले. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राधेश्याम झंवर, संदिप टाक, विनोद इंदानी, राजेश रुद्रवार, जयप्रकाश झंवर, गोविंद शेटे, चक्रधर शिंदे यांच्यासह सर्व वर्ग मित्रांनी विशेष परिश्रम घेतले.
"जुन्या मित्र व मैत्रिणी यांची 27 वर्षानंतर भेट झाल्याने मन आनंदाने भारावून गेले. जुन्या अनेक स्मृतींना उजाळा मिळाला. आजच्या धावपळीच्या जगात असे कार्यक्रम जगण्याची नवी उमेद निर्माण करतात".प्रा.प्रवीण नव्हाडे