खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांच्यामुळे पदविका विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा
अंबाजोगाईच्या शासकीय महाविद्यालयात अस्थिरोग, क्ष-किरणशास्त्र अभ्यासक्रमास राज्य शासनाने दिली मंजूरी
अंबाजोगाई : प्रतिनिधी
पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे
स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अस्थिव्यंगोपचारशास्त्र व क्ष-किरणशास्त्र या दोन विभागांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून सीपीएस अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे, यामुळे गेल्या पंधरा वर्षापासून बंद असलेले हे दोन्ही अभ्यासक्रम आता सुरू होणार असल्याने आठ पदविका विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
अस्थिव्यंगोपचारशास्त्र व क्ष-किरणशास्त्र या विषयातील पदविका अभ्यासक्रम गेल्या पंधरा वर्षापासून बंद असल्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयासमोर फार मोठे संकट उभे राहिले होते. तत्कालिन सरकारने दूर्लक्ष केल्यामुळे या बाबींकडे कुणीही लक्ष दिले नाही पर्यायाने एमसीएच्या तपासणीत वैद्यकीय विभागाच्या ५० जागा कमी झाल्या होत्या. जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी या सर्व बाबींकडे गांभिर्याने लक्ष देवून केंद्र व राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करून ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. केंद्राकडून वैद्यकीय महाविद्यालयाच्या शंभर जागा तर त्यांनी वाचवल्याच शिवाय भविष्यात अशा कांही अडचणी निर्माण होवू नयेत म्हणून या दोन विषयाच्या प्रत्येकी चार जागा पदरात पाडून घेतल्या.
सर्वसामान्य रूग्णांची झाली सोय स्वा. रा. तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात काॅलेज ऑफ फिजिशियन्स अॅन्ड सर्जन्स (सीपीएस) यांचेमार्फत चालविण्यात येणा-या या अभ्यासक्रमास मंजूरी मिळाल्याने विद्यार्थ्यांसोबतच सर्व सामान्य रूग्णांची देखील गैरसोय दूर झाली आहे. महाविद्यालयात येणा-या रूग्णांना यापुढे सोनोग्राफी किंवा हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी खासगी रूग्णालयात जावे लागणार नाही. खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्यामुळे विद्यार्थी आणि सामान्य रूग्ण या दोन्हीसाठी ही फार मोठी उपलब्धी आहे, याबद्दल आ. संगीता ठोंबरे, रूग्णालय अभ्यागत समिती सदस्य डाॅ.पी.एस.पवार, कमलाकर कोपले, राम कुलकर्णी ,कल्पना चौसाळकर, मंगलताई लोखंडे, अधिष्ठाता डाॅ.सुधीर देशमुख यांनी खा. डाॅ.प्रितमताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.
