परळी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कामगार कल्याण निधीत वाढ करण्यासाठी निवेदन देण्यात आले. कामगार कल्याण मंडळाच्या त्रिपक्षीय अंशदान निधीत बऱ्याच वर्षापासून वाढ झालेली नाही. ही निधी वाढ व्हावी म्हणून वारंवार शासन दरबारी प्रयत्न करण्यात आले. परंतु निधीत वाढ होत नव्हती. निधीत वाढ होत नसल्यामुळे कामगार व कामगार कुटुंबीयांसाठीच्या योजना व उपक्रमाची व्याप्ती वाढवता येत नव्हती. या निधीत वाढ व्हावी यासाठी भारतीय बहुजन कामगार संघ संलग्न महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच कामगार कल्याण निधीत वाढ करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बहुजन कामगार संघाचे अध्यक्ष संजय केणेकर, संघटनेचे अध्यक्ष नितीन निंभोरकर, महासचिव संदीप कुलकर्णी, भगवान जरारे, संग्राम साने, शिवाजी वाघ, योगेश पाटील, रवींद्र पडोळ, चांद खान उपस्थित होते.
