वैद्यनाथ मंदीर ते कालरात्री मंदिर पालखी मार्ग स्वच्छ करावा
परळी/प्रतिनिधी : नवरात्र उत्सव संपत आला तरीही प्रशासनाला जाग न आल्याने परळी ते डोंगरतुकाई या रस्त्यावरील खड्डे कायमच असून आता नगर परिषदेने किमान विजयादशमी निमित्त निघणाऱ्या वैद्यनाथ प्रभूंच्या पालखीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पालखी मार्ग स्वच्छ करावा, मार्गावर औषध फवारणी करावी अशी मागणी शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी केली आहे. तसेच कालरात्री देवी ते श्री डोंगरतुकाई देवीकडे जाणारा रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्ता लवकरात लवकर दुरूस्त करावा अशीही मागणी श्री.ठक्कर यांनी केली आहे.
विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी वैद्यनाथ प्रभूंची पालखी श्री कालरात्री मंदिर येथे जात असून तेथे दोन्ही पालख्यांचे एकत्रीकरण होण्याची आपल्या परळीची परंपरा आहे. परंतू ज्या मार्गावरून ही पालखी जाते त्या मार्गावर जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले असून अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यावर पडले आहेत. पालखी वाहून नेणाऱ्या व्यक्तींना तसेच पालखी सोबत जाणाऱ्या भाविकांना या अस्वच्छतेचा मोठा त्रास होत असून नगर परिषदेने तातडीने पूर्ण पालखी मार्गावर विशेष मोहिम राबवून स्वच्छता करण्याची गरज आहे. मागील काही दिवसांपासून या रस्त्यावर स्वच्छता झाली कि नाही एवढी घाण दिसत असून परळी शहरासाठी ही बाब भूषणवाह नाही. दरम्यान नगर परिषदेने तातडीने या रस्त्यावर सखोल स्वच्छता करावी, डेंग्यु, मलेरियाची लागन होवू नये म्हणून औषध फवारणी करावी, उघड्या व गच्च भरलेल्या नाल्यांमध्ये फॉगींग मशिनद्वारे धुर फवारणी करावी असेही आवाहन शिवसेेनेचे जेष्ठ नेते अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यंानी केले आहे.
