शेकडोंची आरोग्य तपासणी; अनेकांनी केले रक्तदान
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
शिक्षण महर्षी स्व.शामराव (दादा) गदळे यांनी केजच्या डोंगरपट्ट्यात उभारलेल्या शिक्षण संस्थेमुळे दुर्गम भागात शैक्षणिक क्रांती घडून आली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असतांना त्यांनी आपल्या मुलांना घडवले. त्यांचा विचार दिला. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच त्यांची तीनही मुलं समाजासाठी कार्य करत आहेत. दादांनी उभारलेले काम आणि त्यांनी दिलेले विचार हे आजच्या तरुणांसाठी दीपस्तंभाप्रमाणेच आहे आणि हा दीपस्तंभ चिरकाळ टिकणारा असल्याचे प्रतिपादन केजच्या आमदार सौ.संगीताताई ठोंबरे यांनी केले. त्या स्व.शामराव (दादा) गदळे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.
शिक्षण महर्षी स्व.शामराव दादा गदळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ दहिफळ (वडमाऊली) येथे अनेक कार्यक्रम संपन्न झाले. मान्यवरांच्या उपस्थितीत दि.01 नोव्हेंबर रोजी 1200 रूग्णांच्या विविध आजारांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर दहिफळ सारख्या ग्रामीण आणि अतिशय दुर्गम भागात 30 जणांनी रक्तदान केले. आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरणही मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. केज तालुक्यातील दहिफळ सारख्या डोंगरपट्यातील भागांत स्व.शामराव दादा गदळे यांनी शैक्षणीक संस्था उभारून क्रांती घडवून आणली व यामुळे या भागांतील मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. शाम विद्यालयात शिक्षण घेतलेली अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवत असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमानिमित्त शाम विद्यालयाच्या प्रांगणात महिला-पुरूषांची मोठी उपस्थिती होती.
केज तालुक्यातील मौजे दहिफळ वडमाऊली येथे शिक्षणमहर्षी स्व.शामराव (दादा) गदळे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरूवातील लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे व स्व.शामराव (दादा) गदळे यांच्या प्रतिमेजे पुजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. सकाळी 8 वाजता नामांकीत डॉक्टरांच्या पथकाने रूग्णांच्या आरोग्य तपासणीला सुरूवात केली. यामध्ये 1200 रूग्णांच्या विविध आजारांचे निदान करण्यात आले. ग्रामीण भागात रक्तदानाविषयी अनेक समज-गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत परंतु शरद गदळे यांच्या टीमने रक्तदान शिबिरास सुरुवात केल्यानंतर ग्रामीण भागातील 30 जणांनी यात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 10 वाजता किर्तन सोहळा पंसन्न झाला. तद्नंतर 12 वाजता मान्यवरांच्या उपस्थिती उत्कृष्ट कामगिरी बजावणार्या आदर्श शिक्षकांचा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी आ.सौ.संगीताताई ठोंबरे, विजय गोल्हार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात, समाजकल्याण सभापती संतोष हंगे, रमाकांत बापू मुंडे, ह.भ.प.रतन महाराज सासुरेकर, विजयकांत मुंडे, ज्ञानोबा विटेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार, डॉ.लक्ष्मीकांत तांदळे, शिक्षणाधिकारी हिरालाल कराड, प.सं.सभापती संदीप पाटील, जि.प.सदस्य राणा डोईफोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, सरपंच सखुबाई मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शालिनीताई कराड यांनी केले तर उपस्थित सर्वांचे डॉ.शशिकांत दहिफळकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करतांना शिक्षणमहर्षी शामराव (दादा) गदळे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. दादांची तीन मुले त्यांचा विचार आणि वारसा घेवून समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र काम करीत आहेत. आजच्या काळात मुले आई-वडीलांचा सांभाळ करत नाहीत अशा काळात दादांच्या विचारांवर सामाजिक कार्यात त्यांची मुले करीत असलेल्या कामाला भविष्यकाळात अधिक गती आणि ताकद येवोत. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी राज्यात सुरू केलेल्या लेक वाचवा अभियानाचा धागा घेवून खुप मोठे काम करीत आहेत. लेकीच्या जन्मासाठी त्या अनेक कुटूंबांना प्रोत्साहन देत असून, त्यांचे हे काम आता मोठी चळवळ झाली आहे अशा भावना उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमास केज तालुक्यातील हजारो नागरीकांची उपस्थिती होती.
लेक वाचवा-राष्ट्र वाचवा
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्राला लेक वाचवा-राष्ट्र वाचवा ही खूप चांगली संकल्पना दिली आहे. त्यांची ही संकल्पना आता खूप मोठी चळवळ झाली आहे. आज संपन्न झालेल्या कार्यक्रमात डॉ.शालिनीताई कराड यांनी या चळवळीसाठी योगदान म्हणून एक घोषणा केली. परळीच्या कराड हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म देणाऱ्या प्रत्येक मातेच्या प्रसूतीची फिस घेतली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या घोषणेनंतर अनेकांनी डॉ.शालिनीताई कराड व डॉ.बालासाहेब कराड यांचे अभिनंदन केले.
