Thursday, December 20, 2018

मुलींनी समाजात वावरतांना स्वावलंबी आणि निर्भिडपणे जगले पाहीजे -गणेश महाडीक

स्वावलंबी जीवन जगण्यासाठी शिक्षण हाच सक्षम पर्याय -डॉ.सौ.शालीनीताई कराड

राज्य महिला आयोग व श्री बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने किशोरवयीन मुलींसाठी एकदिवशीय कार्यशाळा संपन्न



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
मुलींनी समाजात वावरतांना अत्यंत निर्भीडपणे आणि आत्मविश्वासाने जगले पाहीजे, त्याचबरोबर स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशिल असले पाहीजे असे मत उपविभागीय अधिकारी गणेश महाडीक यांनी व्यक्त केले. तर आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलींना स्वावलंबी होण्यासाठी उच्चशिक्षण हाच एकमेव मार्ग असल्याचे प्रतिपादन राज्य बालहक्क आयोगाच्या सदस्या तथा श्री बालाजी प्रतिष्ठाच्या अध्यक्षा डॉ.सौ.शालीनीताई कराड यांनी व्यक्त केले. ते परळी वैजनाथ येथे आयोजित एकदिवशीय कार्यशाळेत बोलत होते.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग व श्री बालाजी वैद्यकीय, सामाजीक, शैक्षणीक आणि संशोधन प्रतिष्ठान, परळी वैजनाथ यांच्या वतीने बुधवार, दि.19 डिसेंबर रोजी परळीक एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यु सहायस्कुलच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. किशोरवयीन मुलींचे आरोग्य, मासिक पाळी व मासिक पाळीतील स्वच्छता व्यवस्थापन, आरोग्य शिक्षण व व्यक्तीमत्व विकास या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते स्त्रिशिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली.
किशोरवयीन मुलींचे आरोग्य, मासिक पाळी व मासिक पाळीतील स्वच्छता व्यवस्थापन, आरोग्य शिक्षण व व्यक्तीमत्व विकास या विषयावर हि एकदिवशीय कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य महिला आयोग व श्री बालाजी वैद्यकीय, सामाजीक, शैक्षणीक आणि संशोधन प्रतिष्ठान, परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून परळीचे उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, परळी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.रामेश्वर लटपटे, पोलिस उपनिरिक्षक श्रीकांत डोंगरे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विद्यासागर हुंडेकर, इंडीयन मेडीकल असो.चे अध्यक्ष डॉ.अजित केंद्रे, नगरसेविका सौ.उमाताई समशेट्टे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की श्री बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केल्या गेलेला कार्यक्रम मुलींसाठी खुप मार्गदर्शक ठरणार आहे. मुलींनीही किशोरावस्थेत होणारे शारीरीक आणि मानसिक बदलांना न घाबरता ते आपल्या जवळच्या आणि विश्वासून घरच्या व्यक्तींना सांगून त्याचे वैद्यकीय पातळीवर शास्त्रशुध्दपणे निरसन करावे. तर पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी विद्यार्थीनींना न घाबरता समाजात वावरता आले पाहीजे यासाठीचा आत्मविश्वास दिला. मुलींना अडचणीच्या वळी मदत करण्यासाठी पोलिस सदैव कार्यतत्पर असून, कोणीही न घाबरता आलेल्या संकटाला हिमतीने तोंड दिले पाहीजे असे आवाहन केले.  तद्नंतर इंडीयन मेडीकल असो.चे अध्यक्ष डॉ.अजित केंद्रे, न्यु हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री वायसे, एकात्मीक बालविकास प्रकल्प अधिकारी विद्यासागर हुंडेकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थीनींना मोलाचे मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थीनींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बालाजी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ.शालिनीताई कराड यांनी तर उपस्थित सर्वांचे आभार प्रतिष्ठानचे सचिव डॉ.बालासाहेब कराड यांनी मानले.

यांनी केले मार्गदर्शन
किशोरवयीन मुलींसाठी घेण्यात आलेल्या एकदिवशीय कार्यशाळेत किशोरवयीन मुलींचे आरोग्य, मासिक पाळी व मासिक पाळीतील स्वच्छता व्यवस्थापन, आरोग्य शिक्षण व व्यक्तीमत्व विकास या विषयावर उपस्थित शेकडो विद्यार्थीनींना अनेकांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रामुख्याने श्री बालाजी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ.सौ.शालीनीताई कराड, डॉ.सुनिता झंवर, डॉ.नेहा शेख यांनी अनेक गोष्टींचे ज्ञान दिले. दैनंदिन जीवनात होणारे बदल, उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असलेला आहार, आणि प्रामुख्याने मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची महत्वाची काळजी याबद्दल त्यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.