परळी :- सातत्याने वादाच्या भोवर्यात राहणारे गंगाखेड शुगर फॅक्टरीचे चेअरमन तथा उद्योजक रत्नाकर गुट्टे हे शारीरिक, मानसिक छळ करत असल्याची तक्रार देत सामाजिक कार्यकर्त्या तथा रत्नाकर गुट्टेंच्या सौभाग्यवती सुदामती गुट्टे यांनी रत्नाकर गुट्टेंविरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कलम ४९८ भा.दं.वि.नुसार गुट्टेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रत्नाकर गुट्टे गेल्या काही दिवसांपासून सुदामती गुट्टे यांना घटस्फोट मागत असल्याचे सांगण्यात आले. सुदामती गुट्टे यांनी रितसर तक्रार दिली असून तक्रारीत अन्य बाबी काय मांडलेल्या आहेत. गुट्टेंसह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल आहे.
कुठल्या ना कुठल्या कारणावरून वादाच्या भोवर्यात राहणारे उद्योजक म्हणून चर्चेत असणारे रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणी आता वाढल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या सौभाग्यवती तथा सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या सुदामती गुट्टे यांनी आज परळी शहर पोलिसात रत्नाकर गुट्टे यांच्यासह अन्य सहा जणांवर शारीरिक, मानसिक छळाबरोबर रत्नाकर गुट्टे हे घटस्फोट मागत असल्याची तक्रार दिली आहे. सुदामती गुट्टे यांच्या तक्रारीवरून रत्नाकर गुट्टेंसह अन्य सहा जणांवर कलम ४९८ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी तक्रारीमध्ये गुट्टे व त्यांच्या परिवारातून आपला शारीरिक, मानसिक छळ सातत्याने केला जात असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर रत्नाकर गुट्टे हे आपल्याला घटस्फोट मागत असल्याचेही सांगण्यात आले आहे. या घटनेने राजकीय आणि उद्योग क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच रत्नाकर गुट्टे हे शेतकर्यांच्या नावावर पैसे उचलल्याच्या कारणावरून अडचणीत आले होते. त्यापाठोपाठ दस्तुरखुद्द त्यांच्या पत्नीनेच आता त्यांच्याविरोधात लेखी तक्रार देऊन गुन्हा दाखल केल्याने गुट्टे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
तक्रारीत गंभीर आरोप
सुदामती गुट्टे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत रत्नाकर गुट्टे हे बाहेरख्याली असल्याचे सांगत रात्री-अपरात्री परस्त्रीयांना घरी घेऊन येतात, असं म्हणत मला घराबाहेर काढण्याची धमकी देत ‘तू मला पसंत नाही,’ असं म्हणून दाबदडप करतात. दीरासह नवरा आणि अन्य आपल्याला पिस्तुलाचा धाक दाखवून तुला खल्लास करून टाकू अशी धमकी देतात यासह अन्य गंभीर स्वरुपाची लेखी तक्रार पोलिसात दिलेली आहे.
