Wednesday, October 23, 2019

पंकजाताईंच्या रॅलीत का गेलीस? असे विचारात धनंजय मुंडे समर्थकांची महिलेला घरात घुसून मारहाण



ना. पंकजाताई मुंडे यांनी दिल्या तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना
बीड : राज्यात चर्चेचा विषय राहिलेल्या परळी विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडल्यानंतर आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे.पंकजाताई मुंडे यांच्या रॅलीत का गेलीस? अशी विचारणा करत असहाय महिलेला तिच्या घरात घुसून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली आहे.

यामध्ये धनंजय मुंडे यांचे समर्थक सुर्यभान मुंडे व त्यांच्या आठ साथीदारांविरूध्द ग्रामीण पोलीसांनी परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी सुर्यभान मुंडे व इतर आठ जणांविरुध्द भादवि कलम ४५२, ३५४, १४३, ३२३, ५०४,५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.सुर्यभान मुंडे हे धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत.हाती आलेल्या माहितीनुसार,रेखा बालासाहेब मुंडे असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव असून ती तळेगांव ता. परळी येथील रहिवासी आहे.यासंदर्भात तिने पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दिली आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार,२२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वा. सुमारास रेखा मुंडे घरात स्वयंपाक करत असताना गावांतील सुर्यभान हनुमंत मुंडे, त्यांचे बंधू ऋषीराज, सुभाष तसेच दिलीप मुंडे, ओमप्रकाश मुंडे, राहूल मुंडे, विष्णू व प्रदीप सूर्यकांत मुंडे सर्व रा.तळेगांव या सर्वांनी घरात घुसून तु पंकजाताई मुंडे यांच्या रॅलीत का गेलीस? त्यांना भेटायला परळीत का गेलीस? असे विचारत तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करून चापट, बुक्क्या व लाथाने बेदम मारहाण केली.एवढेच नव्हे तर या सर्वांनी मिळून तिचा विनयभंगही केला.

कजाताईंनी घेतली तात्काळ दखल

या प्रकरणाची माहिती पंकजाताई मुंडे यांना मिळाल्यानंतर याची गंभीर दखल घेत महिलेच्या पाठिशी उभे राहून पोलिस प्रशासनास तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच,महिलांवरील अशा घटना यापुढे माझ्या मतदारसंघात खपवून घेतला जाणार नाहीत असे सांगितले आहे.विधानसभा निवडणूकीचा निकाल लागण्यास अजून दोन दिवस शिल्लक असताना अशा प्रकारच्या घटना घडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे.